कामगारांच्या हक्कासाठी तुषार भताने यांचा लढा यशस्वी ; हजारो प्रलंबित अर्जांचा मार्ग मोकळा!
नगर : दर्शक ।
प्रशासकीय विलंब आणि माहिती अधिकार कायद्याचा चुकीचा अर्थ लावून माहिती दडपणाऱ्या प्रवृत्ती विरोधात रांजणी ता. पाथर्डी येथील जागरूक नागरिक तुषार अजिनाथ भताने यांनी पुकारलेल्या कायदेशीर संघर्षाला मोठे यश प्राप्त झाले. त्यांच्या सडेतोड पाठपुराव्यामुळे कामगार विभागात प्रलंबित असलेल्या हजारो अर्जांच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
प्रशासकीय हालचालींना वेग: हजारो कामगार आणि विद्यार्थ्यांना दिलासा
तुषार भताने यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने प्रलंबित कामांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर २०२५ अखेर प्रलंबित असलेल्या ४२,९६१ नवीन नोंदणी अर्जांपैकी ४,८३० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, ४२,१५० प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांपैकी १२,२४५ अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
माहिती अधिकार आणि पारदर्शकतेचा मोठा विजय
भताने यांनी जन माहिती अधिकाऱ्यांनी माहिती नाकारल्याबद्दल (कलम ८(१)(j) अंतर्गत) दाखल केलेले प्रथम अपील आता निर्णायक वळणावर आहे. “जी माहिती संसद किंवा राज्य विधिमंडळाला नाकारता येत नाही, ती माहिती नागरिकाला नाकारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे,” असा कडक कायदेशीर पवित्रा त्यांनी घेतला आहे. परवानाधारकांची माहिती हे ‘सार्वजनिक अभिलेख’ असल्याने ती उघड करणे बंधनकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
१७ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता होणार प्रथम अपील सुनावणी
या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत आणि माहिती दडवण्याच्या प्रयत्नावर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत खालील प्रमुख मागण्यांवर निकाल अपेक्षित आहे:
माहिती अधिकार कायद्याचा हेतुपुरस्सर चुकीचा अर्थ लावणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे.
परवानाधारकांची संपूर्ण यादी (नाव, पत्ता, मोबाईल नंबरसह) विनामूल्य उपलब्ध करून देणे.
प्रलंबित नोंदणी आणि शिष्यवृत्तीसाठी विशेष मोहीम (Special Drive) राबवून सर्व अर्ज वेळेत निकाली काढणे.
“हा लढा केवळ वैयक्तिक माहितीसाठी नसून, व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गरीब कामगारांच्या हक्कासाठी आहे. कायद्याचा सन्मान राखून प्रत्येकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.”
— तुषार अजिनाथ भताने
.webp)