Adv.Asim Sarode | अॅड. असीम सरोदे यांच्या सनद रद्दचा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून स्थगित
प्रतिनिधी | पुणे
सुप्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या टिकात्मक विधानांमुळे निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांच्या विरोधातील तक्रारीचा विचार करून त्यांची वकीली सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
या कारवाईविरोधात अॅड. सरोदे यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे आव्हान दिले होते. त्यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्र–गोवा बार कौन्सिलचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अॅड. सरोदे हे सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीमध्ये सहभागी असलेल्या वकीलांपैकी एक आहेत.
एका सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांच्या विधानांबाबत एका तक्रारदाराने महाराष्ट्र–गोवा बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. बार कौन्सिलने सरोदे यांची विधाने बेजबाबदार आणि अयोग्य असल्याचे नमूद करत त्यांची सनद रद्द आणि ₹२५,००० दंड अशी कारवाई जाहीर केली होती.
तथापि, बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या स्थगितीमुळे आता अॅड. असीम सरोदे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

