Ahmednagar Bar Association | सेंट्रल ऍडव्होकेट असोसिएशनची व्याख्यानमाला संपन्न

Ahmednagar Bar Association | नगर : दर्शक ।
राज्यघटना हे न्यायव्यवस्थेचे अधिष्ठान असून न्यायालय ही घटनात्मक संस्था आहे. या न्यायव्यवस्थेने आत्तापर्यंत लोकशाही मजबूत करणारे न्यायनिवाडे दिले आहेत. न्यायालयाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी न्यायाधीशांबरोबरच वकील व सत्ताधाऱ्यांची आहे. ही स्वायत्तता लोकशाही टिकवेल असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी केले.
अहमदनगर सेंट्रल ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालय स्थापनेच्या द्विशताब्दी महोत्सवपूर्तीच्या व्याख्यानमालेत त्यांनी ‘कोर्टाच्या माध्यमातून लोकशाहीचे मजबुतीकरण’ या विषयावर आपले विचार मांडले. याप्रसंगी सौ. संघमित्रा भुयान, मुंबई उच्च न्यायालयातील जिल्ह्याचे पालक न्यायाधीश श्रीमती विभा कंकणवाडी, न्या. रोहित जोशी, प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, जिल्हा पोलीस प्रमुख श्री. सोमनाथ घारगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा सहकारी वकील एस. के. पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
खटल्यातील गुण-अवगुणांचा न्यायाधीशाना परामर्श घ्यावा लागतो
न्यायप्रक्रिया गतिमान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कृती आराखडा राबविण्याचे निर्देश जिल्हा स्तरावर दिले असून पंधरा वर्षांहून अधिक प्रलंबित खटले प्राधान्याने निकाली काढण्यात येत आहेत. न्यायनिवाडा त्वरित मिळावा अशी अपेक्षा करणाऱ्यांना त्यांनी – “ही काय वनडे किंवा वीस-बाय-वीस क्रिकेट मॅच नाही, खटल्यातील गुण-अवगुणांचा न्यायाधीशाना परामर्श घ्यावा लागतो” – असे सुनावले.
सर्वोच्च न्यायालय लोकशाही रक्षणासाठी मुक्त व स्वतंत्र न्यायव्यवस्था संविधानाच्या संरक्षकांची भूमिका पार पाडीत असून संसदेने राज्यघटनेच्या मर्यादा ओलांडण्याचा केलेला प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने लोकांच्या अधिकारांद्वारे वेळीच प्रतिबंध केला. हे त्यांनी विविध खटल्यांचा संदर्भ देऊन स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बजावलेल्या कठोर न्यायदानाचा त्यांनी गौरव केला ज्येष्ठ विधिज्ञांचा सत्कार करताना आपल्या वडिलांच्या वकिलीच्या सुवर्ण महोत्सवी सन्मानाचा प्रसंग सांगताना ते गहिवरून आले.

या सोहळ्यात ७५ वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. एच. काकणी, एस. बी. पलोड, अच्युतराव चौधरी, अशोक कोठारी, राधाकृष्ण पुलाटे, ए. के. गुगळे, विश्वासराव आठरे, पा. अच्युतराव पिंगळे, ए. एस. गांधी, आय. पी. काझी, जगदीश खंडेलवाल, अशोक झरकर व न्यायदानात प्राविण्य मिळवणारे मुंबईचे ऍड. प्रमोद जोशी, नितीन गवारे, किशोर पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी – आत्मविश्वास, मनाची दृढता, कठोर परिश्रम, धैर्य व प्रयत्नातील सातत्यता – या पंचसूत्रांचे पालन केल्यास जीवनात यशस्वी होता येते, असे सांगितले.
न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांनी राज्यघटनेविषयी संवेदनशील राहण्याची प्रेरणा अशा व्याख्यानमालांमधून मिळते, कायद्याचे पालन हे संस्कृतीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे भारतीय संस्कृती महान होईल, असे सांगितले.
वकिलांतून न्यायाधीश घडतात : न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे
जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी – “वकिलांतून न्यायाधीश घडतात. व्याख्यानमालेतील ज्ञानाची पर्वणी नव्या पिढीला संजीवनी देणारी आहे. कायद्यातील तरतुदींचा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ झाला पाहिजे” – असे सांगितले.
सेंट्रल ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अशोक कोठारी यांनी स्वागतपर भाषणात जिल्हा न्यायदान प्रक्रियेतील ऐतिहासिक थोर उज्जल परंपरेचे योगदान अधोरेखित करून व्याख्यानमालेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा अनुभव नव्या पिढीस प्रेरक ठरून ‘सर्वांसाठी न्याय’ या संकल्पनेप्रमाणे न्यायदान प्रक्रियेस गती मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने व न्यायदीप प्रज्वलनाने सोहळ्याची शानदार सुरुवात झाली. असोसिएशनचे सचिव ऍड. योगेश काळे यांनी आभार मानले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने सांगता झाली. जिल्ह्यातील विविध न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कायदे अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
