Ahmednagar College: रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत जनजागृती
Ahmednagar College: अहमदनगर (प्रतिनिधी)- रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत जनजागृती व्हावी या हेतूने अहमदनगर महाविद्यालयात एन.सी.सी, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने ‘रायझिंग डे सप्ताह’ राबविण्यात आला. २ जानेवारी ते ८ जानेवारी हा सप्ताह ‘रायझिंग डे सप्ताह’ म्हणून पाळला जातो. या उपक्रमासाठी अहमदनगर शहर पोलिसांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात भा. पां. हिवाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. मोरेश्वर पेंडाम यांनी भारतामध्ये पोलीस दलाची सुरुवात कशी झाली, पोलीस दलात वेळोवेळी झालेले बदल, पोलीसदलाच्या ध्वजाविषयीचा इतिहास, पोलीसदल सध्या करत असलेले कार्य, पूर्वीचे गुन्हे आणि सध्याचे गुन्हे, इत्यादी मुद्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्री शमुवेल गायकवाड (शहर पोलीस शाखा अधिकारी) यांनी वाहतुकीचे नियम, लायसन काढण्याची अपरिहार्यता, हेल्मेटचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ रजनीश बार्नबस यांच्या प्रेरणेतून आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एन.सी.सी, चे समन्वयक डॉ. माधव जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पवनजीत छाबडा, डॉ. पोपट सिनारे, डॉ. रविंद्र मते, प्रा. प्रबंधिका शेलार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भागवत परकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी अहमदनगर महाविद्यालयाचे आय क्यू ए सी समन्वयक, उपप्राचार्य डॉ प्रीतमकुमार बेदरकर, इ. टी. आय. समन्वयक डॉ. गोकुळदास गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पोपट सिनारे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. भागवत परकाळ यांनी केले.