
Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात ‘चले जाव’ (क्विट इंडिया मूव्हमेंट) यानिमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा गौरव
Ahmednagar College | नगर – अहमदनगर महाविद्यालय गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘चले जाव’ (क्विट इंडिया मूव्हमेंट) यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे, उपप्राचार्य प्रा. दिलीप भालसिंग, विनाअनुदानित विभाग मुख्य समन्वयक प्रा. डॉ. रज्जाक सय्यद, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर वाडेकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सिद्धी नागपुरे (सांख्यिकी विभाग), द्वितीय क्रमांक कु. इकरा फातिमा, तृतीय क्रमांक कु. अक्षदा ढसाळ यांनी मिळवला तर उत्तेजनार्थ केशव गौड याची निवड करण्यात आली. सर्व यशस्वी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी सांगितले की, वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण विकास करण्यास एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. अहमदनगर महाविद्यालयातील गांधी अभ्यास केंद्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळेल.
तर उपप्राचार्य प्रा. दिलीप भालसिंग यांनी वक्तृत्व हे एक नैसर्गिक कौशल्य असून महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हे कौशल्य आत्मसात करू शकतो. आत्मविश्वास हा सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असून सकारात्मक आत्मविश्वास वकृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतो, असे मत व्यक्त केले.
विनाअनुदानित विभागाचे मुख्य समन्वयक प्रा. डॉ. रज्जाक सय्यद यांनी आपल्या भाषणात गांधी अभ्यास केंद्र व राज्यशास्त्र विभागाचा वकृत्व स्पर्धा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कला व कौशल्याला वाव मिळत असून ही संधी युवकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावी. व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीत वकृत्व स्पर्धा महत्त्वाची आहे, असे मत मांडले.
या कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर वाडेकर, प्रा. आकांक्षा नवले, प्रा. भास्कर कसोटे यांची उपस्थिती लाभली होती. तसेच महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. विलास नाबदे यांनी सर्वांचे आभार मानले.
