Ahmednagar College | अहमदनगर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा


 Ahmednagar College | अहमदनगर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; डॉ. दिनेश सावंत यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन


 Ahmednagar College | नगर : दर्शक ।  अहमदनगर कॉलेज येथील डॉ. जॉन बार्नबस पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल फॉर बायोलॉजिकल स्टडीज यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लायब्ररी कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक, संशोधक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम बी.पी.एच.ई. सोसायटीचे चेअरमन डॉ. आर. जे. बार्नबस, सेक्रेटरी डॉ. विशाल बार्नबस तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.

       कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. आर. डी. टाक, प्राध्यापक व रसायनशास्त्र विभागप्रमुख यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत सर सी. व्ही. रमण यांनी १९२८ मध्ये लावलेल्या ‘रमण परिणाम’ या ऐतिहासिक शोधाची आठवण करून दिली. “Women in Science: Catalysing Viksit Bharat” या यावर्षीच्या विषयावर भाष्य करत त्यांनी राष्ट्रनिर्मितीत महिला वैज्ञानिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. विकसित भारताच्या उभारणीसाठी संशोधन, नवकल्पना, नेतृत्व आणि विज्ञानधोरणामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

        डॉ. टाक यांनी विभागाची ओळख करून देताना सांगितले की, रसायनशास्त्र विभागाला डॉ. जॉन बार्नबस पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल फॉर बायोलॉजिकल स्टडीज म्हणून मान्यता असून सध्या सात मान्यताप्राप्त मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली २१ संशोधक पीएच.डी. शिक्षण घेत आहेत. संशोधनाची समृद्ध परंपरा असलेल्या या विभागाने अनेक गुणवंत संशोधक घडविले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

          यावेळी त्यांनी प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जॉन बार्नबस (१९२९–१९९४) यांच्या कार्याची उजळणी केली. आण्विक वर्गीकरण व उत्क्रांतीशास्त्र क्षेत्रातील त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ठरले. त्यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान सल्लागार समिती तसेच जैवतंत्रज्ञान विभागात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७४ मध्ये त्यांना जैवविज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सीएसआयआरचा प्रतिष्ठित ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्रातील शिक्षक म्हणून हा सर्वोच्च सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये त्यांचा अग्रक्रम होता, याचा संस्थेला अभिमान असल्याचे डॉ. टाक यांनी नमूद केले.

          कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. दिनेश सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ, सीएसआयआर–एनसीएल, पुणे व अहमदनगर कॉलेजचे माजी विद्यार्थी यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी शाळेपासून पदवीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासाच्या आठवणींनी केली. ग्रामीण पार्श्वभूमीतून उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना आलेल्या अडचणी, जिद्द, परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो, असे त्यांनी सांगितले. पदवी शिक्षणातील प्राध्यापकांनी दिलेली शिस्त, विषयातील गती आणि विद्यार्थ्यांवरील विश्वास यामुळे संशोधन क्षेत्रात पाऊल ठेवण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

       डॉ. सावंत यांनी आपले संपूर्ण व्याख्यान विभागाचे माजी विभागप्रमुख व एम.एस्सी. ड्रग केमिस्ट्री अभ्यासक्रमाचे संस्थापक स्व. डॉ. विजय खन्ना यांना समर्पित केले. डॉ. खन्ना यांच्या शैक्षणिक दृष्टीकोन, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि संशोधनवृत्तीने आपल्याला प्रेरणा दिल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

       डॉ. सावंत यांनी डॉ. जॉन बार्नबस यांच्या संशोधनकार्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर झालेला प्रभाव विशेषत्वाने मांडला. संशोधनातील काटेकोरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी यामुळे आपण संशोधन क्षेत्राकडे वळलो, असे त्यांनी सांगितले. संस्थेतील संशोधन संस्कृती व मार्गदर्शकांचे प्रोत्साहन हेच आपल्या यशाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

        तसेच विभागातील पदव्युत्तर शिक्षकांचे कौतुक करताना त्यांनी प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण, सूक्ष्म निरीक्षण, अचूकता आणि सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि संशोधनवृत्ती विकसित करणे ही विभागाची मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.

        उच्च शिक्षणासाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी परदेशी व राष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, उद्देशपत्र (SOP), शिफारसपत्रे व संशोधन प्रस्ताव तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. संशोधनपत्रांचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय जर्नल्स व डेटाबेसचा (Scopus, Web of Science, Google Scholar) योग्य वापर, तसेच पीएच.डी.साठी योग्य मार्गदर्शक व प्रयोगशाळेची निवड करताना संस्थेतील संशोधनाचा दर्जा व सुविधा यांचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

       संशोधनासाठी तर्कशुद्ध विचारसरणी, डेटा विश्लेषण, वैज्ञानिक लेखन, सादरीकरण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि टीमवर्क आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अपयशातून शिकण्याची तयारी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. सीएसआयआर–एनसीएलमधील संशोधन अनुभव सांगताना त्यांनी आधुनिक प्रयोगशाळा सुविधा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नवोन्मेषी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

        प्रमुख अतिथींचा परिचय श्री. विशाल कसाब यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईशा रणनवरे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप कासार यांनी केले.

       राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि उच्च शिक्षणाविषयीची प्रेरणा अधिक दृढ झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Scroll to Top