Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात पालक – शिक्षक सभा संपन्न
Ahmednagar College | नगर : दर्शक । डॉ. बी.पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांच्या समग्र विकासासाठी शिक्षक व पालकांचा सक्रिय सहभाग आणि योगदान यावर चर्चा करण्यात आली. ही पालक सभा विज्ञान, वाणिज्य व कला अशा दोन टप्प्यात घेण्यात आली. या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपप्राचार्य प्रतुल कसोटे यांनी पालकांशी संवाद साधताना पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक असणे गरजेचे असून सर्व प्रथम पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करून त्यांच्याशी रोज संवाद साधावा, तसेच मुलांना अभ्यासाबरोबर क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेतील जीवन अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार व योग्य शिक्षण देण्याचे काम पालक व शिक्षकाचे असते, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करता यावा, या उद्देशाने पालक सभेचे अहमदनगर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या पद्धती, पेपर लिहिण्याचे कौशल्य, वर्गातील नियमितता, आदी बाबतचे महत्व सांगण्यात आले. वर्षभरात विद्यार्थ्याच्या घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिके, प्रकल्प, तोंडी परीक्षा, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, प्रवेश परीक्षा मार्गदर्शन याविषयीची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली.
याप्रसंगी पर्यवेक्षिका उज्वला गायकवाड मॅडम, उकिरडे सर, घुमरे सर, कसबेकर सर, बार्नबस मॅडम, कांबळे सर, शिंदे सर, गायकवाड मॅडम, स्वामी मॅडम, तुपे सर, नाथ मॅडम, निघोजकर मॅडम या विषय शिक्षकांनी ही पालकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या सभेचे सूत्रसंचालन घुमरे सर, रिबेका थॉमस मॅडम व ममता पाटोळे मॅडम यांनी केले. तर विजय मोरे सरांनी आभार प्रदर्शन केले. या सभेच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.