Ahmednagar Jail: जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची अहमदनगर कारागृहास भेट
Ahmednagar Jail: अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा कारागृह बोर्ड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकतीच अहमदनगर जिल्हा कारागृह (सबजेल) ला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्व शासकीय सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे अध्यक्षतेखालील बोर्ड समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस सत्र न्यायाधीश अहमदनगर, मा.सचिव-जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्यचिकित्सक, शहर पोलीस उपाधीक्षक, कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग, कारागृह अधिकारी/कर्मचारी व इतर शासकीय पदाधिकारी उपस्थिती होते. यावेळी जिल्हाधिकारी यांचा कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांनी सत्कार केला.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह बोर्ड सदस्यांनी बंद्याना देण्यात येणारे जेवण, नाश्ता, पाकगृहातील सुविधा, तसेच सर्व अन्नधान्य, भाजीपाला यांची समक्ष तपासणी करुन समाधान व्यक्त केले.
बंद्यांची खोलीक्र. 1 ते 5 मधील प्रत्येक बंद्यांची विचारपूस करून त्यांना नियमानुसार देण्यात येणारे अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, कोर्ट पेशी, वैद्यकीय उपचार आदि सुविधा तसेच विनंती, अडचण, प्रशासनाबाबत तक्रार असल्याबाबींची विचारपूस केली. यावेळी बंद्यांनी कोर्ट पेशी, वैद्यकीय उपचार, दवाखाना, पोलीस गार्ड याबाबत कारागृह प्रशासनाकडून नियमानुसार सर्व सुविधा मिळत असल्याचे सांगितले.
बैठकीत बंद्यांच्या वाढीव संख्या बाबत व त्यावरील उपाय-योजना यावर सविस्तर सर्व सदस्यासोबत चर्चा होऊन सद्यस्थितीत प्रस्तावित नारायणडोह येथील नवीन कारागृह बांधकामाबाबत जिल्हाधिकार्यांनी स्वत: लक्ष घातल्याने मागील 4-5 वर्षापासुन प्रलंबित कामाला गती मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच अस्थापनेवरील एकुण स्टाफ, बंदी संख्या, कर्तव्य प्रणालीची माहिती घेऊन निवास व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेराद्वारे सुरक्षा व्यवस्था, कर्मचार्यांचे आरोग्य या बाबींवर चर्चा होऊन एकुण कारागृह प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले.
अधिकारी-कर्मचारी निवासस्थान येथे आज नियोजन समितीमधुन नवीन पार्किंग शेड तसेच कारागृह सुरक्षा अधिक बळकट करण्याकरिता सीसीटीव्ही यंत्रणा मंजुर करत असल्याचे सांगितले.