Ahmednagar Patrakar Sangh | अहमदनगर पत्रकार संघ आणि साई माऊली हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
नगर :
पत्रकार आणि पोलिस खांद्याला खांदा लावून समाजात काम करीत असतात. आजच्या धाकधकीच्या जीवनात पत्रकार आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. साईमाऊली हॉस्पिटल आणि पत्रकार संघाचा आरोग्य तपासणीचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.
अहमदनगर पत्रकार संघ आणि साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शहरातील पत्रकार बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहण्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार संग्राम जगताप, कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे, अहमदनगर पत्रकारसंघाचे अध्यक्ष अनिल लगड, सचिव संदीप रोडे, साई माऊलीचे संचालक डॉ. संतोष गिते, डॉ. तुकाराम गिते, पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष अनंत पाटील आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकांची दिनचर्या, जीवनशैली बदलली आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ जरी आले असले तरी आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. पूर्वी लोक आरोग्यसंदर्भात जागृक होते. आजचे जीवनमान ताणतणावाचे झाले आहे.
त्यामुळे अनेकांनी विविध व्याधी जडल्या आहेत. पत्रकार हा समाजाचा एकप्रकारचा डॉक्टर असतो. समाजातील चुकीच्या गोष्टी जगासमोर आणतो. त्यामुळे प्रशासनाला त्यावर कारवाई करणे भाग पडते. त्यामुळे सामाजातील चांगले-वाईट दाखविणारा एकमेव घटक म्हणजे पत्रकार आहे. पत्रकारांनी समाजात काम करीत असताना शारीरिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्यांची काळजी घ्यावी.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष गिते यांनी प्रास्ताविक करून हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधांची माहिती दिली. त्याचबरोबर नव्याने लहान मुलांसाठी आयसीयू सुरू करीत असल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करून गरज पडल्यास अल्पदरामध्ये उपचार करण्यात येईतील असेही ते म्हणाले. यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर पत्रकारसंघाचे अध्यक्ष अनिल लगड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत वरकड यांनी केले तर, डॉ. तुकाराम गिते यांनी आभार मानले.