Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ
मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सतत भूमिका बदलण्यापेक्षा जरांगेंनी एकच काहीतरी भूमिका घ्यावी असा टोलाही भूजबळ यांनी लगावला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्यांचे 113 आमदार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
त्यांच्या या इशार्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत त्यांना थेट माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, रोज रोज भूमिका बदलत बसण्यापेक्षा मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करून दाखवावेत.येवला मतदारसंघात कोणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगे पाटलांनी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसर्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना 25 वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिले आहे. पण जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकर्यांच्या प्रश्नावर पुढे येत आहेत. त्यांनी एकच काहीतरी करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.