Chhatrapati College | श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थी स्वागत समारंभ संपन्न

Chhatrapati College | नगर : दर्शक ।
“माझा ताण-तणाव ही माझी निर्मिती आहे हे समजून घेणे हेच तणाव व्यवस्थापनाचे पहिले पाऊल आहे. आपण आपल्या भावनांचे स्वामी होणे आणि स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बनणे हेच खरे यशस्वी जीवनाचे तत्त्व आहे,” असे प्रेरणादायी विचार प्रा. गिरीश कुकरेजा यांनी व्यक्त केले. ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष वाणिज्य विद्यार्थी स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रा. कुकरेजा यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तणाव म्हणजे काय, तणाव कसा निर्माण होतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबाव्यात, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. “आजच्या आधुनिक जगात आव्हाने शारीरिक पातळीपेक्षा बौद्धिक आणि भावनिक पातळीवर जास्त आहेत. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी स्वीकारले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रथम वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करत संवाद साधला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी मुस्कान शेख हिने केले, तर आभारप्रदर्शन कु. नलगे प्रीतल हिने मानले.
या वेळी वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. मुकुंद भोस, प्रा. एस. एस. कुरूमकर, प्रा. एस. एस. क्षीरसागर, प्रा. आर. जी. शिंदे, प्रा. आर. आर. भागवत, प्रा. पी. डी. शिपलकर, प्रा. शितोळे मॅडम तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
