Dr.Vikhe Engineering College: डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत ‘अविष्कार 2023’ प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न
नवीन संकल्पना ही निसर्गातच उपजत असते, ती ओळखता आली तरच अविष्कार घडतात – डॉ.मोहन वामन
Dr.Vikhe Engineering College: अहमदनगर (प्रतिनिधी): नवीन संकल्पना ही निसर्गातच उपजत असते, ती ओळखता आली तरच अविष्कार घडतात आणि संशोधनाला वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी संशोधनातील संकल्पना लहान असो वा मोठी यात अडकून न राहता त्याचा मुलभुत अभ्यास करुन संशोधन सिद्ध करण्यावर भर द्यावा. विज्ञानामध्ये रोज नवनवीन बदल घडत आहेत.
त्याचे अवलोकनातूनच अविष्कार घडत असतात. त्यामुळे आपल्या कल्पना फार महत्वाच्या ठरतात. त्याचा योग्य अभ्यास करुन समाजासाठी उपयोगी ठरणारे संशोधन हवे. त्यासाठीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.मोहन वामन यांनी केले.
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अविष्कार 2023’ क्षेत्रीय प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.मोहन वामन, संस्थेचे विश्वस्त वसंतराव कापरे, उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.मोहन वामन म्हणाले, संशोधनाशिवाय विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन स्कील, बॉडी लॅग्वेज याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे संशोधन अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत होते. अविष्कार या स्पर्धेत इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी व मेडिकल, अॅग्री, अॅनिमल हजबन्डरी आदि विषयांचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. विखे पाटील संस्थेने या स्पर्धेचे केलेल्या चांगल्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांतील कल्पना शक्तीला वाव मिळाला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी वसंतराव कापरे म्हणाले, स्पर्धेतून संशोधनास वाव मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या संकल्पना विकसित कराव्यात. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्राचार्य उदय नाईक म्हणाले, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लक्ष देतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तीमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषण कौशल्य, त्यांच्यातील संशोधन वृत्ती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यांचाच एक भाग म्हणून ‘अविष्कार’ प्रोजक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत एकूण 203 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, समन्वयक डॉ.अंकुश शिर्के, डॉ.रविंद्र नवथर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.पी.एस.गायके, प्रा.सौ.पीएस.वैकर यांनी केले तर डॉ.डी.ए.विधाते यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमास संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.खा.सुजय विखे पाटील, प्रभारी जनरल सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड यांनी कौतुक केले.