
Dr.Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील फाऊंडेशनतर्फे भव्य रीकनेक्ट माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
Dr.Vikhe Patil College | नगर : दर्शक । या संस्थेतून घडलेले विद्यार्थी आज देश-विदेशात नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रावीण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी व नवनिर्मितीच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे असावे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन अंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालय, आयबीएमआरडी, फार्मसी कॉलेज व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रीकनेक्ट भव्य माजी विद्यार्थी मेळावा 2025 चे आयोजन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते. यावेळी विश्वस्त अॅड. वसंतराव कापरे, सचिव डॉ.पी.एम. गायकवाड, वैद्यकीय संचालक डॉ.अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक प्रा.सुनील कल्हापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अल्युम्नी मिटसारखे उपक्रम हे नातेसंबंध दृढ करतात
प्रा.डॉ पी.वाय. पवार यांनी स्वागत केले. प्रा.सुनील कल्हापुरे यांनी प्रास्ताविक करताना शिक्षणातील मूल्ये व अनुभवांची देवाणघेवाण महत्त्वाची असल्याचे सांगितले. पुढे बोलताना डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अल्युम्नी मिटसारखे उपक्रम हे नातेसंबंध दृढ करतात. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, कष्ट आणि सातत्य यांच्या जोरावर नवे शिखर गाठावे व संस्थेला जागतिक दर्जा मिळवून द्यावा. असे ते म्हणाले. यावेळी
मेळाव्यातील माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. यामधे नांदेड चे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, कर्नल उपदेश कुमार शर्मा, जनरल मॅनेजर, इन्व्हिडिया बायोसिस्टम, डॉ. प्रताप बडे, सीईओ, एस्पार्डा फॅशन डॉ.संजीव चौहान, असोसिएट डायरेक्टर, नोवार्टिस हेल्थ केअर विश्वास कुमार बोरकर, कृषी उपसंचालक भारत इंगळे यांनी प्रशासन, संरक्षण, संशोधन, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान व कृषी क्षेत्रातील आपापले अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी सचिव जनरल डॉ.पी.एम. गायकवाड, वैद्यकीय संचालक डॉ.अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक प्रा. सुनील कल्हापुरे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.रवींद्र नवथर, आयबीएमआरडी चे प्रा.संजय धर्माधिकारी, फार्मसी चे प्राचार्य डॉ.प्रताप पवार, कृषी चे प्राचार्य प्रा.सोमेश्वर राऊत आदींनी मार्गदर्शन केले. शिक्षक समन्वयक म्हणून डॉ.संदिप उदावंत, आयबीएमआरडी चे डॉ.शुभांगी पोतदार,डॉ.वाहिद आंबेकर, औषध निर्माण शास्त्र. प्रा.किशोर मोरे, कृषि महाविद्यालय यांनी योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानताना सांगितले की, हा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून भावनिक एकतेचा क्षण आहे. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेची पताका जगभर फडकावली आहे, हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. या मेळाव्याची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रगीताने झाली.
