श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी पाककला स्पर्धा संपन्न ; 56 महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

Ganesh Utsav | नगर : दर्शक ।
श्री एकदंत गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमुळे स्थानिक महिला व युवक-युवतींना त्यांच्या कलेला आणि गुणांना योग्य व्यासपीठ मिळते. या वर्षी मंडळाने महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण 56 महिला स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.महिलांनी आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार करून विविध पारंपरिक तसेच नवनवीन खाद्यपदार्थ सादर केले.
ओरिओ मोदक, मक्याचे पॉकेट, ड्राय फ्रुट चाट, गुडालु, दूधी भोपळ्याचा तिरंगी हलवा, आलूचे वडे असे अनेक स्वादिष्ट पदार्थ सादर होताच वातावरणात सणासुदीचा गोडवा पसरला. महिलांच्या कल्पकतेला व परीश्रमांना उपस्थितांनीही दाद दिली. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणार्या महिलांची नावे अशी – प्रथम क्रमांक- अवंतिका गाजेंगी (ओरिओ मोदक), द्वितीय क्रमांक – सुरेखा इराबत्तीन (मक्याचे पॉकेट), तृतिय क्रमांक – आरती इराबत्तीन (ड्राय फ्रुट चाट),चौथा क्रमांक – मीना बुरगुल (गुडालु) उत्तेजनार्थ -रोहिणी गाजुल ( दूधी भोपळ्याचा तिरंगी हलवा) उत्तेजनार्थ – सुप्रिया गाजेंगी (आलूचे वडे) यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना प्यारेलाल खंडेलवाल महाराज म्हणाले की, महिलांच्या प्रतिभेला योग्य मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य श्री एकदंत गणेश मंडळ गेली अनेक वर्षेकरत आहे. या पारंपरिक उपक्रमामुळे गणेशोत्सव अधिक रंगतदार व समृद्ध होत असून, महिलांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही मंडळाच्या कार्याला मिळालेली खरी दाद आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चंद्रकांत बेत्ती यांनी मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या रोजच्या दगदगीतून एक हक्काचा आनंद मिळावा, त्यांना वेगळेपणाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने दरवर्षी मंडळाच्या वतीने पाककला, संगीत खुर्ची, विडी वळणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, असे ते म्हणाले.
या स्पर्धेचे परिक्षण प्यारेलाल खंडेलवाल महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन सुंकी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत आडेप यांनी मानले. उपस्थित मान्यवर, स्पर्धक व प्रेक्षकांनी महिलांच्या कलागुणांना मिळालेल्या या व्यासपीठाचे कौतुक केले.
हि स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
