Hazrat Meeravali: मिरावली पहाड येथे मिरावली बाबांचा दि.26 व 27 रोजी संदल-उरुस

मिरावली पहाड येथे मिरावली बाबांचा दि.26 व 27 रोजी संदल-उरुस
    अहमदनगर- सालाबादप्रमाणे मौजे कापुरवाडी येथील जागृत देवस्थान हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली पहाड दर्गा येथे गुरुवार दि.26 रोजी संदल व शुक्रवार दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे वंशावळ विश्वस्त आसिफखान पीरखान पठाण यांनी आवाहन केले.
     हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मिरावली बाबांची दर्गा ही अहमदनगर शहरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर कापुरवाडी येथील पहाडावरील जागृत देवस्थान असून, अहमदनगर जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नागपुर, फलटण, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, पिंपरी, चिंचवड, नाशिक मनमाड सह राज्याबाहेरील विविध राज्यातील विविध भागातून बाबांना मानणारे सर्व धर्मिय भाविक येथे येत असतात.
     संदलनिमित्त गुरुवार दि.26 रोजी सायंकाळी अहमदनगर शहरातील चितळे रोड येथील हजरत सय्यद हैदरशाह दर्गा येथून संदल मिरवणुकीला सायं.6 वा. सुरुवात होणार असून, यावेळी फुलाची चादर असलेले घोडा बग्गी गाडीला रोषणाई करण्यात येणार आहे. मिरवणुकीत फकीर जमातचेवतीने जरब केले जाते. आकर्षक शोभेचे दारुकाम करण्यात येऊन विविध बॅण्ड पथक सहभागी होणार आहेत.
     ही मिरवणुक चितळे रोड, नेता सुभाष चौक, तेलीखुंट, एम.जी.रोड, भिंगारवाला चौक मार्गे, जुना कापड बाजार, पिरशाह खुंट, कादरी चौक, रामचंद्र खुंट, झेंडीगेट मार्गे मिरवणुक निघणार असून, पहाटे पहाडावर दर्गा येथे संदल चढविण्यात येणार आहे.
     पहाडावर शुक्रवारी सकाळी 7 वा. भाविकांसाठी भंडारा-लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तरी सर्व हिंदू-मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दर्गा विश्वस्त चेअरमन हाजी अन्वर खान आणि सर्व विश्वस्त, मुजावर (खादीम) यांचेवतीने करण्यात आले आहे.