हार्टफुलनेस ” ब्राईटर माईंड” च्या कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद
Heartfulness Nagar | नगर – हार्टफुलनेस ध्यान केंद्राच्या वतीने हार्टफुलनेस उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘ब्राईटर माईंड ‘ या अभिनव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. धर्माधिकारी मळा येथील आयुर्वेद परिचय केंद्रात आयोजित या कार्यशाळेत नगर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
५ ते २५ वर्षे वयोगटातील मुले मुली व विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या कार्यक्रमात “ब्रायटर माईंड ” च्या पुणे येथील ब्रायटर माईंड च्या राष्ट्रीय समन्वयक भगिनी सुरभी सहाय यांनी मुलांच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यायामाचे वेगवेगळे प्रकार शिकवले. मागचा, मधला व पुढचा असे मेंदूचे तीन भाग असतात. परंतु मानव त्याच्या मेंदूचा फक्त १५ ते २० टक्केच वापर करतो.
जर मेंदूचा वापर अधिक क्षमतेने केला तर जीवनात अनेक प्रकारे यश मिळू शकते. नगर येथील ब्राईटर माईंडचे प्रशिक्षक डॉ. ऋषिकेश उदमले यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. या उपक्रमात मुलांसह त्यांच्या पालकांनी देखील सहभागी होऊन आनंद घेतला.
मुलांनी ब्रायटर माईंड कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना हार्टफुलनेस रिलॅक्सेशन व पालकांना हार्टफुलनेस ध्यानाचा अनुभव देण्यात आला.
यावेळी मेंदूच्या विकासाचा आणि ध्यानाचा मानवी आयुष्यावर होणारा सकारात्मक परिणाम उपस्थितांना समजावून सांगण्यात आला.कार्यक्रमाला सुमारे 80 जण उपस्थित होते.
यापुढेही असाच कार्यक्रम मोठ्या स्तरावर घेण्याचा मानस आहे असे हार्टफुलनेस अहिल्यानगर केंद्राचे समन्वयक वैद्य मंदार भणगे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हार्टफुलनेस अहिल्यानगर केंद्राचे प्रशिक्षक, अभ्यासी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले .

