Homeopathy | मिशन होमिओपॅथी तर्फे जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त चर्चासत्र संपन्न
नगर – 10 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो.10 एप्रिल 1755 रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल ह्यानिमन यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या या महान संशोधनाला वंदन म्हणून हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो.
याचेच औचित्य साधून मिशन होमिओपॅथी या संघटनेतर्फे सहा एप्रिल रोजी नगर येथील सावेडी भागातील व्हाईट हाऊस येथे संपूर्ण दिवसभरासाठी होमिओपॅथीच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांसाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी विविध महाविद्यालयातील एकूण 90 विद्यार्थी व डॉक्टर यांनी सहभाग नोंदवला होता.
या चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष असलेले डॉ.अजित फुंदे, अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सौ. पूनम गायकवाड आणि तसेच अरुणोदय औषधालय याचे संचालिका सौ. वर्षा भनगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘ द हार्मनी ऑफ लाईफ थ्रू क्लासिकल होमिओपॅथी’ असे या चर्चासत्राचे शीर्षक होते. या चर्चासत्रात आपल्या अनुभवातून आणि होमिओपॅथीच्या शास्त्रशुद्ध वापरातून कसे विविध आजाराचे विविध रुग्ण बरे करता येतात हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मुख्य तीन होमिओपॅथी तज्ञ उपस्थित होते.
डॉ.सोनल खळदे एम.डी. (होमिओपॅथी) या चिंचवड येथे प्रॅक्टिस करणारे होमिओपॅथी तज्ञ त्यांच्या त्वचेचे आजार, केसांचे विकार आणि हृदयाचे आजार कसे बरे केले जातात हे प्रेझेंटेशन द्वारा सर्वांना समजेल अशा पद्धतीने सादरीकरण करण्यात आले.
डॉ.शितलकुमार सोनवणे एम.डी. (होमिओपॅथी) यांची कोपरगाव येथे होमिओपॅथिक प्रॅक्टिस असून आपल्या विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अगदी जलद, सहज आणि पूर्णपणे आराम कसा मिळाला याचे सादरीकरण अगदी सोप्या शब्दात समजून सांगितले.
डॉ. साईनाथ चिंता एम.डी. (होमिओपॅथी) यांनी त्यांच्या होमिओपॅथिक हॉस्पिटल मध्ये कसे सर्व क्रिटिकल आणि असाध्य आजार बरे होतात याचे सादरीकरण केले. निमोनिया, मायग्रेन आणि आतड्यातील सूज व पिळ या आजारात कसे विना आय.सी.यू., विना ऑक्सिजन आणि विना ऑपरेशन रुग्ण बरे होतात हे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ.अजित फुंदे यांनी अशा चर्चासत्राच्या माध्यमातून अनेक नवीन विद्यार्थी आणि डॉक्टर्सना लाभ होऊन ते सर्व होमिओपॅथीच्या प्रॅक्टिससाठी नक्कीच प्रोत्साहित होतील ही आशा व्यक्त केली. अशा संघटनांना आणि त्यांच्या कार्यांना माझी पाठबळ नेहमी राहील, तसेच होमिओपॅथीला खरा राजश्रय मिळवून देण्यासाठी आपण आतापर्यंत कसे कार्य केले आणि पुढील काळात आपण कशी वाटचाल करणार आहोत याचे विश्लेषण त्यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. सुनील पवार यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात होमिओपॅथीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कसे विविध माध्यमातून कार्य केले हे उपस्थितांना सांगितले. तसेच, मिशन होमिओपॅथीच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ.पुनम गायकवाड यांनी अशा चर्चा सत्राच्या माध्यमातून प्रात्यक्षिक ज्ञानाचे देवाणघेवाण होत असल्याचे नमूद केले आणि त्यातून आपणास भरपूर शिकायला ही मिळत असते म्हणून त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी अशा चर्चासत्रात भरपूर संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे नमूद केले.
या कार्यक्रमांतर्गत नगर येथील दोन्ही होमिओपॅथिक महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना कै. अशोकराव जंगले पाटील व कै.पोपटराव जंगले पाटील यांच्या नावाने स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तसेच नवीन, उदयोन्मुख होमिओपॅथिक तज्ञ म्हणून डॉ. प्रियंका धाकतोडे यांना देखील हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या चर्चासत्रात सहप्रायोजक म्हणून अरुणोदय औषधालय, भिस्तबाग, सावेडी, यांनी सहभाग नोंदवला होता. अरुणोदय औषधालयाचे संचालक श्री. उदय भणगे व सौ. वर्षा भणगे यांच्यातर्फे दोन्ही महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उदयोन्मुख होमिओपॅथिक तज्ञ म्हणून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना होमिओपॅथिक आवश्यक औषधांचा कीट देऊन सन्मानित करण्यात आले.
या चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी होमिओपॅथिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करून सेवा देणाऱ्या आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी अविरत कार्य करणाऱ्या होमिओपॅथिक तज्ञांची नावे घोषित करण्यात आली. सन 2024-25 साठी, अहिल्यानगर येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. साईनाथ दत्तात्रय चिंता यांचे नाव डॉ. ह्यानीमन जीवन गौरव पुरस्कार साठी घोषित झाले. म्हणून मिशन होमिओपॅथी व डॉ.राजेंद्र श्रीमाळी, कोपरगाव, यांच्यातर्फे शॉल, श्रीफळ व स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संकेत लांडे, डॉ. आकांक्षा लांडे, डॉ. सुनिता चिंता डॉ. अनिल नवथर, डॉ. सचिन ठाणगे यांनी परिश्रम घेतले.
या चर्चासत्रात आणि उद्घाटनाच्या सोहळ्यात आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत, सुंदर असे सूत्रसंचालनाचे कार्य डॉ. रुपेश सोनवणे (छत्रपती संभाजीनगर) यांनी केले.
या सदर कार्यक्रमात डॉ. निलेश जंगले पाटील यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी, डॉक्टर्स, पाहुण्यांचे आणि वक्त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले, डॉ. निकम सरांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली मिशन होमिओपॅथी, नगर, या संघटनेचे असेच विविध उपक्रम वेळोवेळी येथे होणार आहेत आणि त्याचा भरपूर लाभ सर्वांनी घ्यावा.