IMA Ahmednagar: मानवी आरोग्यासाठी डॉक्टरांचे योगदान अपेक्षेपलीकडील : डॉ.मिलिंद पोळ

 ‘आयएमए’च्यावतीने अनामप्रेम संस्थेतील मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणी

IMA Ahmednagar: मानवी आरोग्यासाठी डॉक्टरांचे योगदान अपेक्षेपलीकडील : डॉ.मिलिंद पोळ

    अहमदनगर (प्रतिनिधी)– समाजातील दु:ख कमी करण्याचे काम डॉक्टर्स करत असतात. मनुष्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ते अथक प्रयत्न करतात. डॉक्टर हे देशाचे सैनिक आहेत, जे सीमेवर लढत नाहीत पण जीव वाचवण्यासाठी आणि आयुर्मान सुधारण्यासाठी समर्पितपणे काम करतात.


 मानवी आरोग्यासाठी त्यांचे योगदान अपेक्षेपलीकडे आहे. कोविड-19, डिसिज द, प्लेग, फ्लू, एड्स, इबोला आणि सर्वसामान्य लोकांचे रक्षण करण्यासाठी इतर साथीच्या परिस्थितीला प्रतिसाद देणारे ते नेहमीच पुढे असतात. त्याचप्रमाणे समाजातील दुर्लक्षित घटकांनाही योग्य व चांगले उपचार मिळावेत, 


यासाठीही प्रयत्नशिल असतात. आज अनामप्रेम मधील मुला-मुलींची ‘डॉक्टर्स डे’ निमित्त तपासणीचा असोसिएशनने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यातून असोसिएशनचे सामाजिक दायित्व सिद्ध होत असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद पोळ यांनी केले.


     डॉक्टर्स डे निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने अनामप्रेम संस्थेच्या निंबळक येथील सत्यमेव जयते ग्राम रविनंदा संकुल येथील निवासी 200 दिव्यांग विध्यार्थी- विद्यार्थिनी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी असोसिएशचे अध्यक्ष डॉ.मिलिंद पोळ, सचिव डॉ.सचिन पांडूळे, उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र वानखडे, डॉ.बाळासाहेब देवकर, 


डॉ.सुरेंद्र रच्चा, डॉ.गणेश बडे, डॉ.पियुष मराठे, डॉ.राहुल पंडित, डॉ.प्राजक्ता पारधे, डॉ.दिपाली पांडूळे, डॉ.सोनल बोरुडे, डॉ.प्रतिभा परहर, डॉ.चेतना बहुरुपी, डॉ.उज्वला शिरसाठ, डॉ.मुकुंद तांदळे आदिेसह  अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने, सचिव डॉ. मेघना मराठे, अभय रायकवाड, उमेश पंडुरे, प्रवीण नवले उपस्थित होते.


     याप्रसंगी सचिव डॉ.सचिन पांडूळे म्हणाले, समाजात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. ते त्यांचे जीवन रुग्णांच्या कल्याणासाठी वाहून घेतात, रोग किंवा आजारातून जलद बरे होण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांला चांगली आरोग्य सेवा मिळावी, असे प्रयत्न आहेत. 


विशेषत: दुर्लक्षित घटकांच्या प्रगती व उन्नत्तीसाठी काम करत आहे. अनामप्रेम संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहे. यातील मुला-मुलींचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी असोसिएशन पुढील काळातही सर्व प्रकारची वैद्यकीय मदत करेल, असे सांगितले.

     यावेळी अजित माने म्हणाले, आरोग्य सुधारण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे कुशल वैद्यकीय तज्ञ असल्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि योगदानाबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. आज आमच्या संस्थेतील मुला-मुलींची तपासणी करण्याचा उपक्रमामुळे उत्तम दर्जाची सेवा मिळाली आहे. त्यामुळे या मुला-मुलींचे आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल, असे सांगितले.


     या तपासणी शिबिरात अनामप्रेम संस्थेतील सर्व दिव्यांग यांची रक्ताची तपासणी , थायरॉईड तपासणी हाडांची तपासणी, साखर तपासणी, दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या . यावेळी सर्व संस्थेतील दिव्यांग यांना आवश्यक औषधे आय.एम.ए. द्वारे देण्यात आली. या शिबिरात फिजिओ व सर्जरीद्वारा अपंगत्व तीव्रता कमी करण्याबाबत डॉ. राहुल पंडित यांनी मार्गदर्शन केले.


     या उपक्रमास साई एशियन हॉस्पिटल व वानखडे हॉस्पिटल आणि एचसीटी डायग्नोस्टिकचे डॉ.मुकुंद तांदळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र वानखेडे यांनी केले तर डॉ.सुरेंद्र रच्चा यांनी आभार मानले.