Kedgao होम मिनिस्टर स्पर्धेत अनिता मोटकर प्रथम, रोहिणी गायकवाड द्वितीय

नगर : दर्शक ।
केडगाव उपनगरामध्ये शिवसेना नेते दिलीप सातपुते व ओंकार सातपुते मित्रमंडळ संचालित कल्याणी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारेगाव ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच निर्मलाताई नवले व अहिल्यानगर महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर शीलाताई शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सरपंच निर्मलाताई नवले म्हणाल्या की, ओंकार सातपुते महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवत असून अशा कार्यक्रमामुळे महिलांना कलागुण सादर करण्यास तसेच आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी व्यासपीठ मिळते. एवढे सुंदर काम केल्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो.
त्यांनी पुढे सांगितले की, या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण होतो तसेच समाजामध्ये त्यांना एक वेगळं स्थान मिळतं. येत्या काळात ओंकार सातपुते महिलांसाठी तसेच सर्वांसाठी चांगल्या उपक्रमांचे आयोजन करेल याचा मला विश्वास आहे.
या वेळी शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख दिलीप दादा सातपुते यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कल्याणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वर्षभर शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक असे विविध उपक्रम राबवत असतो. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि या निमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टर पैठणी खेळ आयोजित करून त्यांना आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रोत्साहनाचा क्षण देणे हे आमचे कर्तव्य आहे.
दिलीप दादा सातपुते पुढे म्हणाले की, महिलांच्या सहभागाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे यावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कल्याणी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. येत्या काळातही महिला व तरुणाई यांच्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले जातील.
स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक अनिता मोटकर (फ्रिज), दुसरा क्रमांक रोहिणी गायकवाड (वॉशिंग मशीन), तिसरा क्रमांक सपना गायकवाड (टीव्ही), चौथा क्रमांक स्नेहल दळवी (कुलर), पाचवा क्रमांक स्वाती शिंदे (होम थिएटर), सहावा क्रमांक प्रिया भरमे (मिक्सर) व सातवा क्रमांक तांदळे ताई (इस्त्री) यांनी पटकावला. यासह इतर अनेक महिलांना देखील बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याणी प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच उद्धव काळापहाड यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या खास कार्यक्रमाने महिलांना मंत्रमुग्ध केले.
कल्याणी प्रतिष्ठानतर्फे वर्षभर शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात. गणेशोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांनी समाधान व्यक्त करत दिलीप सातपुते व ओंकार सातपुते यांचे आभार मानले.
