Kojagiri Purnima: स्नेह 75 ग्रुपच्यावतीने नवदुर्गाचा सत्कार
Kojagiri Purnima: अहमदनगर (प्रतिनिधी): आज सर्वच क्षेत्रात महिला या आघाडीवर आहेत, महिलांमध्ये एक दैवी शक्ती असल्याने त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पुरातन काळापासूनच महिलांना विशेष स्थान देण्यात आले आहे. लक्ष्मी-सरस्वती-दुर्गा अशी अनेक रुपे स्त्रीयांमध्ये असतात. प्रेम-वात्सल्याबरोबरच प्रसंगी आक्रमक होऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध ती उभी ठाकली आहे. त्याची अनेक उदाहरणे आपल्या धार्मिक ग्रंथाबरोबरच इतिहासातही दिसून येतात.
आजची स्त्रीही त्याच कर्तुत्वान स्त्रीयांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आजची स्त्री आबला नसून सबला आहे हे या स्त्रीकडे पाहिल्यानंतर दिसून येते. या नवदुर्गांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचा गौरव स्त्री सन्मानाची परंपरा कायम ठेवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. आज स्नेह 75 च्यावतीने आपल्या कार्यकर्तुत्वाने विविध क्षेत्र गाजविणार्या नवदुर्गांचा सन्मान हा स्त्री शक्तीचा जागर असल्याचे प्रतिपादन उद्योजक विश्वनाथ पोंदे यांनी केले.
स्नेह 75 च्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नवदुर्गाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विश्वनाथ पोंदे, सौ.जयश्री डावरे, सौ. लता कुलकर्णी, डॉ. शशी उदास, ईश्वर सुराणा, दिनेश गुगळे, अभय गांधी, मिलिंद भारदे, अजित चाबूकस्वार, धनेश बोगवत, प्रमोदकुमार छाजेड आदि उपस्थित होते.
या नवदुर्गामध्ये सौ.मधुरा क्षितिज झावरे (रोटरी क्लब), सौ. वृषाली प्रकाश गायकवाड (अध्यात्मिक), सौ.शिल्पा अतुल सोमणी (उद्योजीका), सौ. निता म्हस्के (उद्योजिका), सौ. इंदिरा राजेश भालसिंग ( एलआयसी अधिकारी), कु.प्रणाली बाबासाहेब कडूस (शिवव्याख्याती ), सौ.हर्षदा अशोक डोळसे (कला) आदिंचा सन्मान केला.
याप्रसंगी नवदुर्गा मधुरा झावरे म्हणाल्या, आज स्त्री सक्षमपणे उभी आहे हे शक्य एका दिवसात शक्य झाले नाही. यासाठी माँ जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या त्यागातून, पराक्रमातून. पुरातन काळापासून स्त्रीयांचा सन्मानही आपली परंपरा राहिली आहे. परंतु मधल्या काळात स्त्रीयांवर अनेक बंधने आली, परंतु संघर्ष करत स्त्रीयांनी आपले कर्तुत्व सिद्ध करत आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. स्नेह 75 ने आमचा केलेल्या सन्मानाने स्त्रीयांविषयी समाजामध्ये आदरभाव निर्माण होण्यास मदत होऊन, आमच्या कर्तुत्वाला पाठबळ मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी स्नेह 75चे प्रमोद छाजेड यांनी स्नेह 75 ग्रुपच्या माध्यमातून समाजात आपल्या कार्याने जनमानसात वेगळे स्थान निर्माण केलेल्या व्यक्तींप्रती नेहमीच आदर भाव व्यक्त करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या दैनंदिन कामातून इतरांपुढे आदर्श निर्माण करत असतो. अशा व्यक्तींचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचे कौतुक हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनेश बोगावत यांनी केले तर आभार अभय गांधी यांनी मानले. या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक केले.