Molana Azad Nagar | मखदूम सोसायटी तर्फे मौलाना आझाद शिक्षक पुरस्काराचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक विचारवंत एक राजकीय नेतृत्व एक धर्म पंडित आणि आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे भारतरत्न मौलाना आझाद यांचे संपूर्ण जीवन हे भारत मातेसाठी समर्पित होते .शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाने दिल्या जाणारा मौलाना आजाद शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला ते सर्व शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत असे प्रतिपादन अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट संगमनेरचे चिफ ट्रस्टी व महाराष्ट्र राज्य उर्दू बचाव समितीचे राज्याध्यक्ष अब्दुल्लाह हसन चौधरी यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद व रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असलेल्या राष्ट्रीय एकता सप्ताह मध्ये जिल्ह्यातील १६ गुणवंत व ज्ञानवंत शिक्षकांना भारतरत्न मौलाना आझाद शिक्षक पुरस्कार देऊन शानदार कार्यक्रमात गौरविण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चौधरी हे बोलत होते.
संगमनेर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन शेख गणी हाजीभाई यांचे शुभ हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. व्यासपीठावर अंजुमन इस्लाम संगमनेर ट्रस्टचे सचिव शौकतखान पठाण,उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष के के खान,रहमत सुलतान फाउंडेशन चे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे, सरकारी शाळा वाचवा अभियानाचे संयोजक सुदाम लगड,उर्दू महिला आघाडीचे अध्यक्ष नर्गिस इनामदार, डॉ शमा फारुकी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिदखान दूल्हेखान यांनी या सप्ताह मागची भूमिका विशद केली.उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा परिचय आपल्या ओघवत्या शैलीत करून दिला. याप्रसंगी हाजी शकील खान,शाकीर अहमद शाकीर, सुजाता पुरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
अब्दुल्लाभाई चौधरी यांनी आपल्या मनोगतात मौलाना आझाद यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
या कार्यक्रमात जिल्हाभरातील बारा उर्दू आणि चार मराठी माध्यमाच्या शिक्षकांना भारतरत्न मौलाना आझाद शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मौलाना आझाद हे देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी त्यांच्या नावाने शिक्षक पुरस्कार देण्याचा संकल्प मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिदखान यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले. तर आभार महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी मानले.
यावर्षीचे भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे- शेख आसमा अश्फाक,हुसेन बादशाह मोमीन,शेख आफरीन मोहम्मद, शेख मोहम्मद बदर बनेसाहब,सय्यद तौसीफ चांदसाहब, शेख नाजेमा नवाब, शेख फरहत हबीब,शेख रेश्मा फय्याज, खान शबीस्ता नासीर,शेख शाकीर अब्दुल रशीद,अंजुम एजाज पठाण,
सुजाता नवनाथ पुरी, दिपाली अशोक कापरे,सय्यद नाज़िया असगर,सौ.मीनाक्षी सोमनाथ जाधव,नितीन विठ्ठल पंडित.याप्रसंगी राजूभाई शेख,जावेद मास्टर, सदाकत हुसेन, फैयाज शेख,हनीफ शेख,समीना शेख, शमजा बागवान, शफकत सय्यद, तनवीर चष्मावाला, जावेद तांबोली,नईम सरदार आदी उपस्थित होते.

