Nagar Music | ऋत्विक योगेश झंवरचे संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर यश

Nagar Music | नगर : दर्शक ।
अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटन आयोजित नेक्स्ट जन सुपर स्टार सांस्कृतिक महोत्सव – 2025 मध्ये ऋत्विक योगेश झंवर याने आपले कौशल्य दाखवत थेट राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचा जिल्हा स्तरावरील प्रारंभिक टप्पा कोल्हार येथे झाला. म्युझिकल सोलो (वयोगट 14 ते 40) या विभागात ऋत्विकने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला. अहमदनगर माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष श्री. श्यामजी भूतडा तसेच सचिव श्री. संकेतजी मानधना यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्री. अक्षय बाहेती यांनी केले.
यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा पुणे येथे पार पडली. येथेही ऋत्विकने प्रभावी कामगिरी करून राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. नगर जिल्ह्याचे माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष महेशजी भराडिया व जिल्हा सांस्कृतिक मंत्री सौ.सेजलजी राठी यांनी या स्तरावर त्याला मार्गदर्शन केले.
तीन टप्प्यांत ही स्पर्धा पार पडली
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा 24 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथे पार पडली. या स्पर्धेत तबला, ढोलक, व्हायोलिन, हार्मोनियम, माऊथ ऑर्गन, बासरी अशा विविध वाद्यांसह संगीतकलाकार देशभरातून सहभागी झाले होते. तीन टप्प्यांत ही स्पर्धा पार पडली. पहिल्या फेरीतून पाच जणांची निवड झाली, दुसर्या फेरीतून तीन जणांची निवड झाली व अखेरीस अंतिम फेरीत ऋत्विकने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद मिळवले.
नेक्स्ट जन सुपर स्टार सांस्कृतिक महोत्सव – 2025 या राष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षण कोलकात्याचे प्रख्यात संगीतकार श्री. पार्थोमुखर्जी व हैद्राबादच्या सुप्रसिद्ध गायिका ज्योती शर्मा यांनी केले. या स्पर्धेत महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. विनीतजी तोष्णीवाल व सचिव पियुषजी राठी यांचे विशेष सहकार्य लाभले.
ऋत्विक हा आयकॉन पब्लिक स्कूल, इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. शाळेचे संगीत शिक्षक श्री. यश वाडेकर सर यांनी या स्पर्धेसाठी त्याला बहुमूल्य मार्गदर्शन, सराव व सहकार्य केले. आयकॉन पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. दीपिकाजी नगरवाला यांनी देखील त्याला पाठबळ दिले. ऋत्विक सध्या श्री दीपक भानुसे (बासरी वादक) पुणे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.
ऋत्विक हा श्री. योगेश झंवर व सौ. श्रद्धा झंवर यांचा मुलगा असून श्री. मोतीचंदजी झंवर यांचा नातू आहे. त्याचे काका संगणक अभियंता व तबलावादक श्री. जितेश झंवर यांनीही या स्पर्धेसाठी ऋत्विकला विशेष मार्गदर्शन केले.
