Nagar School | वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनाचा खरा आधार; श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
Nagar School | नगर : दर्शक । दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उद्धव अकॅडेमी संलग्न श्री चैतन्य टेक्नो स्कूल, अहिल्यानगर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रदर्शनात इयत्ता विविध वर्गांतील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रात्यक्षिकांसह सहभाग नोंदवत आपली कल्पकता आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिकॉर्न अकॅडेमीचे संचालक मंगेश तवले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. अॅन्सी, अकॅडेमिक डीन के. सुमन, बीडीएम शशिकुमार, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रदर्शनात विज्ञान, गणित, भूगोल, जीवशास्त्र आदी विषयांवरील विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले होते. पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण, मानवी शरीररचना, गणिती संकल्पनांचे मॉडेल्स अशा अनेक विषयांवरील प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण भाषाशैलीत आपल्या प्रकल्पांचे सुस्पष्ट स्पष्टीकरण देत परीक्षक व पाहुण्यांची प्रशंसा मिळवली. उत्कृष्ट प्रकल्पांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना मंगेश तवले म्हणाले की, विज्ञान हाच जीवनाचा खरा आधार आहे. आजचे युग हे वैज्ञानिक युग असून आधुनिक विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही. जुन्या रूढी-परंपरांच्या पलीकडे जाऊन तर्कशुद्ध विचार करणे ही काळाची गरज आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प आणि त्यांचे आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण पाहून मी भारावून गेलो आहे.
मुख्याध्यापिका सौ. अॅन्सी यांनी आपल्या मनोगतात शाळा व्यवस्थापन व शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, निरीक्षणशक्ती व सृजनशीलता विकसित होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन श्रुती पाटोळे, गौरव संत, गायत्री बाले, उर्मिला काळे, असिफ शेख, गणेश चिल्का, मोहित उजागरे व आदित्य क्षीरसागर यांनी केले. समन्वयिका पायल खंडेलवाल यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
.webp)