Nanded Accident: शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन 7 महिला शेतमजुरांना प्राण गमवावे लागले. वसमत तालुक्यातील गुंजगाव येथील 10 महिला आणि 1 पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेतात येत असताना चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट विहिरीत पडला. या प्रकरणी आता लिंबागाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी ड्रायव्हर आणि मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल होत आहे. तसेच त्यांना अटक सुद्धा करणार असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पार्वतीबाई बुरड या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर या प्रकरणी आरोपी अटकेत असलेली नाव नागेश आवटे (वय 25 रा. तुमचा, जिल्हा:हिंगोली) तर दूसरा आरोपी दगडोजी शिंदे (वय 52 रा. आलेगाव) हे आहेत.
ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात एक ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिलांचा (Women) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (4 मार्च) सकाळी घडली. हळद काढणीच्या कामासाठी या महिला ट्रॅक्टरमध्ये बसून कामावर जात असताना हा अपघात झाला. या विहिरीला कठडा नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शन सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने देखील मदत व बचावकार्य सुरू केले. त्यामुळे, विहिरीत पडलेल्या 10 पैकी 3 महिलांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र, एकाच गावातील 7 महिलांचा पाण्यात बुडून झाला. या दुर्दैवी घटनेनं गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत.
दरम्यान, आता या ट्रॅक्टर ट्रॉली अपघात प्रकरणी मयतांची नावे स्पष्ट झाली आहेत, यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

अपघातातील मृतांची नावे
१)चोत्राबाई माधव पारधे (वय 45)
२)सिमरन संतोष कांबळे (वय18)
३)सपना राजु राऊत (वय 25)
४)ज्योती इरबाजी सरोदे (वय 35)
५)सरस्वती लखन बुरड (वय 25)
६) ताराबाई सटवा जाधव (वय35)
७)धुरपता सटवा जाधव (वय 18)
अपघातातील जखमींची नावे
१)पूरबा बाई संतोष कांबळे (वय ३५)
२) पर्वतबाई रामा बुरुड (वय २५)
३)सटवा जाधव (वय ४८)