New York | न्यूयॉर्कमध्ये शिवछत्रपतींची भव्य मिरवणूक – छत्रपती फाउंडेशन तर्फे आयोजन

New York | नगर : दर्शक ।
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित इंडिया डे परेड मध्ये महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन घडविणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ दिमाखात सादर करण्यात आला. छत्रपती फाउंडेशनच्या वतीने सजविण्यात आलेल्या या कीर्तीरथाने सातासमुद्रापारही मराठी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवले, अशी माहिती आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे यांनी दिली.
या परेडला अमेरिकेचे विविध भाग तसेच भारतातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून उत्साहात सहभाग नोंदवला. यावर्षी ग्रँड मार्शल चा मान सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांना मिळाला. मिशिगन राज्याचे यूएस हाऊस ऑफ रेप्रेसेंटेटिव्हजचे खासदार श्री. श्री ठाणेदार हे कीर्तीरथावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी रथावरून रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या जनसमुदायाला अभिवादन केले. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांनी परेडची औपचारिक सुरुवात केली तर भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत बिनया प्रधान यांनी छत्रपती फाउंडेशनच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.

कीर्तीरथावर छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, बालशिवबा आणि मावळ्यांचे सजीव चित्रण करण्यात आले. बालक, महिला व युवकांनी ऐतिहासिक पोशाख परिधान करून केलेल्या अभिनयाने वातावरण भारावून गेले. यावेळी जल्लोष ढोल-ताशा पथकाचे ५० हून अधिक वादकांनी अवघे न्यूयॉर्क दुमदुमवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या रुद्र डान्स अकॅडमी च्या मुलींनी लेझीम व विविध नृत्य सादर केले. या निमित्ताने शंभरहून अधिक कलाकारांनी महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास व लोककला अमेरिकन जनतेसमोर भव्य स्वरूपात मांडली.

या भव्य परेडमध्ये भारतीयांसह अमेरिकन नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला
या भव्य परेडमध्ये भारतीयांसह अमेरिकन नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. मॅडिसन अव्हेन्यू भगवामय झाल्याचे दृश्य सर्वांना भावणारे होते. New York Parade Life या वृत्तपत्राने शिवछत्रपती कीर्तीरथाला “Best Float” असा बहुमान देत, शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मुळांशी जोडला असल्याचे नमूद केले.

गेल्या १५ वर्षांपासून छत्रपती फाउंडेशन, न्यूयॉर्क ही संस्था शिवजयंती, जिजाऊ जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत आहे. नुकतेच त्यांनी भारतीय दूतावासात शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा केला होता. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स तर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी इंडिया डे परेड यंदा छत्रपती फाउंडेशनच्या कीर्तीरथामुळे विशेष लक्षवेधी ठरली.
या भव्य उपक्रमाच्या यशामागे फाउंडेशनच्या दहा राज्यांमधून आलेल्या सदस्यांची अपार मेहनत असून ढोल-ताशा पथक व रुद्र डान्स अकॅडमीच्या कलाकारांचे योगदान विशेष कौतुकास्पद ठरले. या उपक्रमामुळे छत्रपती फाउंडेशनने अमेरिकन भूमीवरही मराठी संस्कृतीचा मानाचा तुरा उंचावला आहे.
