खेडकर यांच्या बंगल्यातून शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल, तीन काडतुसं जप्त
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जात असल्याचे दिसत आहे. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, खासगी गाडीवर लाल दिवा वापरणं, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणं, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत.
त्यासंदर्भात तिच्या आई मनोरमा खेडकर यांना नुकतीच अटक करण्यात आली तर तिचे वडील दिलीप खेडकर यांची एसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्या फरार झाल्या. अखेर बऱ्याच तपासानंतर मनोरमा यांना रायगडमधील एका लॉजमधून अटक करण्यात आली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
तेव्हा त्यांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दरम्यान, ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी खेडकर यांच्या बाणेरमधील ओम दीप बंगल्याची झडती घेतली.
यावेळी पोलिसांनी तेथून मनोरमा यांनी शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल, तीन काडतुसं जप्त केली. तसेच खेडकर यांनी त्यावेळी वापरलेली लँड क्रूझर गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. ग्रामीण पोलिसांकडून बंगल्याची झडती चतु:शृंगी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मनोरमा यांनी बंदूक दाखवून मुळशीतील शेतकऱ्याला धमकावल्याचं त्यात दिसत होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्या फरार झाल्या. त्यांचा फोनही लागत नव्हता.
तपासानंतर पोलिसांनी अखेर गुरूवारी त्यांना रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमधून अटक केली. याप्रकरणी न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यावर त्यांना 20 जुलैपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी दिली होती .