Rotary Club | रोटरी क्लब यांच्यावतीने बारडगाव दगडी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य व सॅनिटरी पॅड वाटप

Rotary Club | नगर : दर्शक । कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयामध्ये रोटरी क्लब हडपसर पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीतील 81 विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य देण्यात आले, तर इयत्ता सातवी ते दहावीतील 72 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लब हडपसर पुणेचे अध्यक्ष संभाजी काकडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मुकुल सिन्ना, अनिल रासकर, सागर कांडेकर आदी उपस्थित होते. यावेळी गावचे सरपंच कृष्णा मरळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास कदम, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कदम, पांडुरंग गवळी, तसेच पिटी शर्मा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक साके सर, साबळे सर, शिंदे सर, गार्डी सर, सावंत सर, कदम सर, पठाण सर, मिरगणे सर, जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब यांनी हे साहित्य ’प्रुडेंट कार्पोरेट डवायजरी सव्हिसेस लिमिटेड’ यांच्या सीएसआर फंडामार्फत उपलब्ध करून दिले.
अध्यक्ष संभाजी काकडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी कितीही उत्सुक असले तरी आर्थिक अडचणीमुळे त्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हे आमचे कर्तव्य आहे. शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि रोटरी क्लब हडपसर पुणे नेहमीच या दिशेने काम करत राहील.
ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्याकडे लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे
ते पुढे म्हणाले की, फक्त शालेय साहित्य देऊन थांबणे हा आमचा हेतू नाही. ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्याकडे लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप करून आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश आम्ही दिला आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर आरोग्य हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत.
प्रमुख पाहुणे संचालक मुकुल सिन्न यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समाजाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. लहान मुलांना पुस्तकं, दप्तर, लेखनसाहित्य मिळाले की त्यांचा अभ्यासाकडे ओढा वाढतो. आम्हाला आनंद आहे की या उपक्रमामुळे बारडगाव दगडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उभारी मिळेल.
ते पुढे म्हणाले की, मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करणे हा केवळ आरोग्याचा विषय नाही, तर त्यांच्या आत्मसन्मानाशी निगडित प्रश्न आहे. समाजातील महिलांना सशक्त करायचे असेल, तर त्यांचे शिक्षण व आरोग्य याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. रोटरी क्लब अशा उपक्रमांद्वारे महिलांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी जाधव सर यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले व संस्थेला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील पालक व विद्यार्थी यांच्यात समाधानाची भावना निर्माण झाली.
