Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarrotary club | रोटरी क्लबचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

rotary club | रोटरी क्लबचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

rotary club  रोटरी क्लबचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

rotary club  नगर : दर्शक । रोटरी क्लब नगरला यावर्षी 78 वर्षे पूर्ण झाली असून नुकताच वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी स्थापन झालेल्या या क्लबने नगर जिल्ह्यात रोटरीची चळवळ रुजवली. आज जिल्ह्यात तब्बल 17 रोटरी क्लब कार्यरत असून समाजकार्यात आपापले मोलाचे योगदान देत आहेत. रोटरी क्लब अहिल्यानगरने गेल्या 78 वर्षांत केलेले कार्य आजही समाजासाठी आदर्शवत मानले जाते.
       स्थापनेपासूनच या क्लबने  शहर व जिल्ह्यात अनेक उपक्रमांची परंपरा निर्माण केली. ट्रेड फेअरची संकल्पना अहिल्यानगरमध्ये आणून व्यावसायिकांना नवे मार्ग मिळवून दिले. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करून त्याचा चेहरा बदलला. महावीर कलादालन येथे पेन्सिल स्केचद्वारे तयार केलेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आजही अभिमानाने जपले जात आहे.
अंध बांधवांसाठी “रोटरी निवारा” या वसाहतीचे बांधकाम करून त्यांना छत्र दिले, रोजगार निर्मितीसाठी सहकार्य केले आणि मागील वर्षी त्या वसाहतीतील घरांचा सातबारा देऊन त्यांना कायमस्वरूपी हक्क प्रदान केला. वृक्षारोपण, रक्तदान, बेटी बचाव – बेटी पढाव, महिला सबलीकरण अशा असंख्य उपक्रमांमधून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्यरत राहिलेला हा क्लब आज जिल्ह्याचा गौरव मानला जात आहे.

रोटरी क्लब नगरची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली

       वर्धापन दिनानिमित्त क्लबचे अध्यक्ष सुभाष गर्जे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “रोटरी क्लब नगरची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली आणि त्यानंतर आजवर समाजहितासाठी कार्य करण्याची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या 78 वर्षांत हजारो कुटुंबांपर्यंत रोटरीचे कार्य पोहोचले आहे. रोटरीचे प्रत्येक प्रकल्प हा केवळ सेवा कार्य नसून तो समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरला आहे. आम्ही करत असलेले काम हे समाजाच्या विश्वासातून चालले आहे आणि या विश्वासाला आम्ही नेहमीच पात्र राहण्याचा प्रयत्न करू.”
      तसेच पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, “आजच्या काळात गरिब व वंचित घटकांच्या मुलांना शिक्षण, रोजगार व आरोग्य यांची हमी मिळाली पाहिजे. रोटरी क्लब यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. बेटी बचाव – बेटी पढाव मोहिमेद्वारे महिलांना सक्षम करणे, शाळकरी मुलींना निर्भय करण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच रक्तदान, वृक्षारोपण यांसारखे उपक्रम हे रोटरीच्या कार्याचा अविभाज्य भाग राहतील. पुढील काळात आणखी मोठे प्रकल्प उभे करून अहिल्यानगरकरांचा विश्वास जपणे हे आमचे ध्येय असेल.”
      या प्रसंगी सचिव संदीप ठोंबे, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, निलेश वायकर, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, कौशिक कोठारी, महादेव देशमुख, महावीर मेहेर, नितीन खाडे, प्रशांत बोगावत, अशोक मवाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते केक कटिंग करून वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ झाला. सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या रोटरी क्लब अहिल्यानगरच्या या कार्याबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम जाधव व निलेश वायकर केले तसेच आभार सचिव संदीप ठोबे यांनी मानले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments