Satkar: गुणी खेळाडूंना संधी मिळाल्यास ते आपले कर्तुत्व सिद्ध करतात: संजय चोपडा

 Satkar:  जागतिक  पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अर्चना काळे यांनी रजत पदक  मिळविल्याबद्दल सत्कार

Satkar: गुणी खेळाडूंना संधी मिळाल्यास ते आपले कर्तुत्व सिद्ध करतात: संजय चोपडा




    Satkar:  अहमदनगर (प्रतिनिधी): नगरमधील कलाकार, खेळाडू आपल्या मेहनतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या कर्तुत्वाने चमकत नगरचे नाव जागतिक पातळीवर नेत आहेत. नुकत्याच मंगोलिया देशात झालेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नगरच्या पोलिस कर्मचारी अर्चनाताई काळे यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत रजत पदक पटकाविले, ही नगरकरांच्या दृष्टीने मोठी अभिमानास्पद बाब आहे. 


पोलिस दलातील नोकरी सांभाळून आपल्यातील खेळाडूला प्रोत्साहन देण्याचे काम अर्चना काळे यांनी केले आहे. त्यांच्या या कर्तुत्वाने नगरचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे. गुणी खेळाडूंना संधी मिळाल्यास ते आपले अस्तित्व नक्कीच सिद्ध करु शकतात, ही त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी यापुढील अशाच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा मर्चंटस् बँकेचे संचालक संजय चोपडा यांनी दिल्या.


     नुकत्याच मंगोलिया देशात झालेल्या जागतिक  पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अहमदनगर पोलिस दलातील महिला कर्मचारी अर्चनाताई काळे यांनी रजत पदक  मिळविल्याबद्दल त्यांचा मर्चंटस् बँकेचे संचालक संजय चोपडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजय चोरडिया, अशोक गुगळे, सौ. लता गुगळे आदि उपस्थित होते.


     सत्कारास उत्तर देतांना अर्चनाताई काळे म्हणाल्या, प्रत्येकात काहीतरी कला-गुण असतात त्याचा विकास करणे गरजेचे असते. जागतिक स्तरावरील स्पर्धेत नगरसारख्या छोट्या शहरातील खेळाडू पदके मिळवू शकतात. त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीची गरज आहे. आपल्या जागतिक स्पर्धेतील विजयाबद्दल सत्कार केल्याने आपणास प्रोत्साहन मिळणार आहे. यापुढेही विविध स्पर्धामध्ये सहभागी होवून देशाला पदक मिळवून देत नगरचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले.


     याप्रसंगी संजय चोरडिया, अशोक गुगळे यांनीही अर्चनाताई काळे यांच्या कार्याचे कौतुक करुन महावीर चषक परिवार व जैन बांधव, सामाजिक व न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे यांनीही शुभेच्छा दिल्या.