Savedi Dekhava | महाभूपती” एक अनोखा देखावा

Savedi Dekhava | नगर : दर्शक ।
यावर्षी गणेश उत्सवानिमित्त सावेडी येथील अशोका आर्ट गॅलरीमध्ये एक अनोखा देखावा नैसर्गिक साधन साहित्याचा उपयोग करून साकारला आहे.
पंचतत्व…
मानव दानव आणि देवही ज्यांचे अंश आहेत. अशा निसर्गातील जल, अग्नी, वायू, धरती आणि आकाश यांचे अस्तित्व अनादी आहे. सर्व सजीवांचा जन्म देखील याच पंच तत्वामुळे आणि अंतदेखील या पंचतत्वातच होतो. जिवंत असण्याची जाणीव या तत्त्वांमुळेच… निसर्गातील हे घटकच खऱ्या अर्थाने मानवाची दैवी जाणीव आणि मार्गदर्शक …
या पंचतत्वाचा स्वामी म्हणून श्री गणेशाला ओळखले जाते. म्हणूनच त्याचे नाव “महाभूपती” असेही आहे. मानव आणि सर्व सजीव निसर्गाचाच एक घटक असूनही निसर्गाची अतोनात हानी करीत आहे. अन्न, वस्त्र निवाऱ्यासोबत आपल्या अनावश्यक इच्छा, आकांक्षा आणि विविध उत्सव साजरा करण्याची अतिरेकी इच्छा यामुळे निसर्गाची प्रचंड हानी करीत आहे. जल प्रदूषण, वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषण, प्रचंड वृक्षतोड आणि रासायनिक खतांचा प्रचंड वापर यामुळे मानव भूमी देखील प्रदूषित करीत आहे.
यांची जाणीव व्हावी म्हणून यावर्षी पंचमहाभुतांचा स्वामी महाभुपती “श्री गणेशाचे सुंदर शिल्प” पृथ्वीतत्त्वातील माती पासून घडविले असून त्यासोबत पंच महातत्वांचा देखावा सादर केला आहे. सर्व नैसर्गिक साधन साहित्य वापरून.. अनंत अवकाशा समोर जल, अग्नी, वायू आणि धरती यांचे चित्राच्या माध्यमातून अस्तित्व दर्शविले आहे.
हा संपूर्ण देखावा इंटेरियर श्रद्धा डोळसे हिने सौ हर्षदा आणि अशोक डोळसे यांच्या सहकार्याने प्रयत्नपूर्वक साकारला आहे.
