
Sindhi Samaj: अहमदनगर (प्रतिनिधी): सिंधी बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाचे पर्व (16 जुलै ते 24 ऑगस्ट) अर्थात ‘चालिहो साहेब’ची कालपासून मोठ्या श्रद्धाभावाने सुरुवात झाली. सिंधी कॉलनी येथील श्री झुलेलाल मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पुज्य बहराणो साहिबची पुजा अहमदनगर सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आरती, अखो, पल्लव तसेच भजने म्हणत उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी समाजातील अनेक मान्यवर व भाविक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. याशिवाय सावेडी येथील सत्नाम साक्षी गो-शाळेत व गुलमोहोर रोडवरील माता लालवारी झुलेलाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी ‘चालिहो’ उत्सवास प्रारंभ करण्यात आला.
चालिहो विषयी अधिक माहिती देतांना सिंधी जनरल पंचायत समितीचे प्रसिद्धी प्रमुख किशोर खुबचंदानी म्हणाले की, ‘चालिहो’ नावाच्या या धार्मिक सणोत्सवाला सिंधी समाजात आगळे-वेगळे असे महत्व आहे. चालिहो सणाचा संबंध जलदेवतेशी आहे. सिंधी समाजात वरुण देवतेची पूजा प्राचिन काळापासून केली जाते. चालिहो हा वरुणदेवता झुलेलाल यांच्या पुजेशी संबंधित असून, भगवान झुलेलाल हे सिंधी समाजाचे इष्टदेव आहेत. चालिहो याचा अर्थ चाळीस दिवांसांचे व्रत, उपवास, पूजा इत्यादी. झुलेलालचे भक्त चाळीस दिवसांचा उपवास करतात. या काळात काही नियम पाळीत, वरुण देवतेची पूजा व स्तुती करण्यात येते. मंदिरात जाऊन सामुहिक प्रार्थनेद्वारे समस्त मानवजातीच्या कल्याणाची भावना व्यक्त केली जाते, असे शेवटी सांगितले.
सिंधी कॉलनी येथील श्री झुलेलाल मंदिरात पुढील चाळीस दिवस दररोज सायंकाळी बहराणोची पूजा, आरती, पल्लव नंतर हथप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, रात्री 10 ते 11 या वेळेत किशोर शेरवानी यांचे भक्तीगीते, झुलेलाल स्तुतीगितांचा कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री झुलेलाल मंदिर समिती व सिंधी जनरल पंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.