
Sneahalay | नगर : दर्शक –
पॅलेस्टाईन ,युक्रेन इ. ठिकाणी चालू असणारी भीषण युद्ध, जगभर वाढलेली बालकांची मानवी तस्करी, गरिबी आणि विस्थापन यांमुळे जगातील लक्षावधी बालकांनी आपले कुटुंबीय आणि घर गमावले आहे. त्यांच्या कौटुंबिक पुनर्वसनाचे प्रश्न जगभर ऐरणीवर आले असताना बालकांच्या पुनर्वसनासाठी स्नेहांकूर दत्तक विधान केंद्र पथदर्शी काम करीत असल्याचे प्रतिपादन सौ. सिमरन बत्रा यांनी येथे आज केले.
सेंट्रल अडॉपशन रिसोर्स अथॉरिटी ( CARA) ही संस्था दत्तक विधान क्षेत्राचे भारतात नियमन करते. या संस्थेकरीता भारतातील मुले दत्तक घेणाऱ्या परदेशी पालकांसाठी सौ.बात्रा समन्वय आणि मार्गदर्शनाचे काम करतात.
स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रातील अनाथ असलेल्या लव (12 वर्षे) आणि कुश (6 वर्षे) ( बदललेली नावे ) या अनाथ भावंडांना इटली देशातील पालकांना भव्य दत्तक विधान सोहळ्यात काल देण्यात आले. यावेळी सौ. बात्रा पालकांसह दत्तक मुले स्वीकारण्यासाठी केडगाव येथील स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र येथे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक जाणीव जपणारे डॉक्टर दांपत्य डॉ. सौ. प्रणाली आणि डॉ.राहुल त्रिमूखे , सौ श्वेता आणि श्री.अमित गुंदेचा यांच्या हस्ते दत्तक विधान करण्यात आले.
राष्ट्रीय युवा योजना उपक्रमाचे राष्ट्रीय संघटक ओरिसा येथील मधुभाई दास , स्नेहालयाच्या विश्वस्त रूपाली मुनोत, एडवोकेट श्याम असावा इ .यावेळी उपस्थित होते.
Sneahalay | वेदनेचा प्रवास संपला
नगर जिल्ह्यातील दुर्गम गावात कुश आणि लव यांचा परिवार राहायचा. वडिलांच्या बाहेरख्यालीपणामुळे कधीही बऱ्या न होणाऱ्या दुर्धर आजाराचा संसर्ग आईला झाला. आपल्या जन्मदातीला कुश आणि लव या तिच्या मुलांनीच आई बनून शेवटचे 4 वर्ष सांभाळले. या मुलांच्या कुशीतच वर्ष 2022 मध्ये त्यांच्या आईने शेवटचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर वडिलांचे दुर्लक्ष ,व्यसन आणि सावत्र आईचा भीषण जाच यामुळे कुश आणि लव घर सोडून पळाले.
कुटुंबाचे परिस्थिती आणि वडिलांची मन:स्थिती यावर स्नेहांकुरने काम केले
या घटनेची माहिती मिळाल्यावर स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने पोलिसांचे सोबतीने या मुलांचा शोध सुरू केला. बीड, छत्रपती संभाजीनगर , पुणे , जळगाव येथे या बेपत्ता मुलांचा 2 महिने अखंड शोध घेतला. अखेरीस एका धार्मिक आश्रमात त्यांचा शोध लागला. या कुटुंबाचे परिस्थिती आणि वडिलांची मन:स्थिती यावर स्नेहांकुरने काम केले. या मुलांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनीच करावा , यासाठीचे स्नेहांकुरचे सर्व प्रयत्न थकले. अखेरीस 7 नोव्हेंबर 2022 रोजी या मुलांचे वडील अहिल्यानगर येथील बाल कल्याण समिती समोर दोन्ही मुलांसह उपस्थित झाले. या मुलांचा त्यांनी कायदेशीर परीत्याग केला.
स्नेहांकुरच्या प्रेमळ आणि सुरक्षित वातावरणाने कुश आणि लव यांना आत्मीयतेचा नवा अनुभव दिला. लवने स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल मधील हुशार विद्यार्थी म्हणून नाव मिळवले . कुश स्नेहांकुर मधील पूर्व प्राथमिकच्या वर्गातील सर्वात नटखट मुलगा म्हणून ओळखला जातो. आज आपल्या इटलीतील पालकांना कुश आणि लव भेटले. काही मिनिटांनी त्यांच्या कुशीत विसावले. दत्तक विधान प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्याकरिता आज आपल्या नव्या आई-वडिलांसह ही मुले दिल्लीला रवाना झाली.
