Snehalay | प्रतिबंधात्मक उपायांऐवजी केवळ परिणामांवर होणारे काम समस्यांचे मूळ : डॉ. शिरीषा साठ्ये
Snehalay | नगर : दर्शक ।
पीडित महिलांवर काम केले जाते. परंतु ज्यांच्या वर्तनामुळे पीडा निर्माण होते त्यांच्यावर काम होत नाही. प्रतिबंधात्मक उपायांऐवजी केवळ परिणामांवर काम होत असल्याने महिलांच्या समस्यांचे मुळापासून निराकरण होत नसल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट
डॉ. शिरीषा साठे यांनी केले.
भारताचा राष्ट्रीय महिला आयोगाने स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा पाठलाग आणि छळ या विषयावरील भारतातील पहिली कार्यशाळा नुकतीच स्नेहालय मध्ये संपन्न झाली.
यावेळी मानसिक आरोग्य, चित्रपट, रंगभूमी, साहित्य या क्षेत्रातील मान्यवरांनी विविध संलग्न विषयांची मांडणी केली. मानसग्राम प्रकल्पात कार्यरत रूपाली खराडकर यांनी डॉ. साठे यांची प्रकट मुलाखत घेतली.
डॉ. साठे म्हणाले की,लिंग आधारित भेदभाव आणि अत्याचार कमी करण्यासाठी कुटुंबाने मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान वागणूक द्यावी. डॉ. साठे पुढे म्हणाल्या की, घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर समान कामे, समान संधी आणि समान जबाबदाऱ्या मुला मुलींना मिळाल्या तरच समानतेचे मूल्य समाजात रुजेल.
पाठलाग आणि छळाच्या मुळाशी मनोविकृती
================
जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मानसग्राम प्रकल्पातील मानसोपचार तज्ञ डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांनी नमूद केले की,मानसिक प्रवृत्ती आणि विकृतींमुळे व्यक्ती वास्तव आणि कल्पना यामधील सीमारेषा ओलांडते. त्यातूनच पाठलाग, छळ असे त्रासदायक वर्तन क्रमशः विकसित होत जाते.
डॉ. मिस्कीन यांची मुलाखत स्नेहालय संस्थेच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख संजय चाबुकस्वार यांनी घेतली.
पाठलाग करणारे आणि त्याच्या बळी असणाऱ्या महिलांच्या मानसिकतेबद्दल डॉ.मिस्कीन यांनी विस्तृत विवेचन केले. पाठलागाची सुरुवात साधारणपणे एखाद्या व्यक्तीविषयी असलेल्या अति आकर्षणातून किंवा तिच्यावर आपला अधिकार असल्याच्या भावनेतून होते.
संबंधित व्यक्तीने आपल्याला स्वीकारावे, आपल्याशी संबंध ठेवावा किंवा आपल्यावर प्रेम करावे अशी एकतर्फी अपेक्षा पाठलाग करणाऱ्याच्या मनात तयार होते. ती पूर्ण न झाल्यास तो व्यक्ती अंतिमतः त्रास आणि छळ आरंभतो.
स्टॉकरच्या किंवा पाठलाग करणाऱ्याच्या वर्तनामध्ये “फिटिंग ग्रुप टेंडन्सी” दिसते. म्हणजेच तो स्वतःला एखाद्या विशिष्ट गटाशी जुळवून घेण्याचा किंवा त्या गटामध्ये आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. किशोरवयीन, तरुण आणि प्रौढ अशा तीन वयोगटांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात ती आढळते.
याशिवाय काही विशिष्ट मानसिक विकृती (Personality Disorders)
स्टॉकरच्या मानसिकतेमध्ये दिसून येतात. काही जणांना स्वतःबद्दल अति महत्त्वाची भावना, इतरांनी आपल्याला विशेष मान द्यावा अशी अपेक्षा आणि नकार सहन न करण्याची प्रवृत्ती विकसित होते. त्यातून पाठलाग करणारे गुन्हेगारी कृती करू शकतात, असे डॉक्टर मिस्कीन म्हणाल्या.
एका प्रकारात व्यक्तींच्या भावनांमध्ये तीव्र चढउतार असतात. त्यांना नातेसंबंध टिकवून ठेवण्याबाबत असुरक्षितता वाटते त्यातून अतिरेक वर्तन घडू शकते, असे डॉक्टर मिस्कीन यांनी नमूद केले.
चित्रपटसृष्टी खलनायक
=============
डॉ. प्रीती भोम्बे यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधील प्रोफेसर तसेच भारतातील आघाडीचे ध्वनीतज्ञ
कामोद खराडे यांची मुलाखत घेतली.
श्री.खराडे म्हणाले की,
अनेक चित्रपटांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, जबरदस्तीने प्रेम व्यक्त करणे, किंवा एखाद्या स्त्रीवर अधिकार गाजवण्याची भावना यांचे चित्रण आढळते.
अशा प्रकारचे सादरीकरण समाजाच्या मानसिकतेवर दुष्परिणाम करते .
काही वेळा चुकीच्या वर्तनाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देते.
कामोद यांनी शोले या चित्रपटातील प्रसंग नमूद केला. यात नायक पाण्याच्या टाकीवर जाऊन संपूर्ण गावासमोर प्रेमाची घोषणा करतो. भावनिक दबाव निर्माण करून आपले प्रेम स्वीकारण्यासाठी नायिकेला प्रवृत्त करतो.
ही कल्पना लोकप्रिय झाली. सतत प्रयत्न करून किंवा भावनिकरीत्या एकतर्फी आवडणाऱ्या व्यक्तीस मजबूर करून प्रेम मिळवणे ,हे रोमँटिक म्हणून दाखवले गेले.
हळूहळू ही संकल्पना समाजमानसात रुजली. मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवले जाणाऱ्या वर्तनाचे युवक अनेकदा अनुकरण करतात. ते अनेकदा मुलींच्या जीवनावर देखील बेतते.
श्री खराडे यांनी नमूद केले की, देश आणि संस्कृतीनुसार चित्रपटांतील सादरीकरण आणि समाजातील वर्तन यामध्ये बदल दिसून येतो. प्रत्येक देशातील सामाजिक मूल्ये, परंपरा आणि संस्कृती लोकांच्या विचारसरणीवर आणि वर्तनावर परिणाम करतात. त्यामुळे माध्यमांचा प्रभावही त्या त्या सामाजिक संदर्भानुसार बदलतो.
.jpeg)