Dr.Vikhe Patil College | संशोधनातूनच शाश्वत विकास आणि औद्योगिक प्रगती साध्य होईल–मंगेश कुलकर्णी
Dr.Vikhe Patil College | नगर : दर्शक ।
नगर येथील विळद घाट मधील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मटेरियल सायन्स तसेच एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या विषयांवरील दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदांचा संयुक्त उद्घाटन समारंभ महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.
यंत्र अभियांत्रिकी विभाग, टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर, अकॅडमी ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी अँड वेस्ट वॉटर इनोव्हेशन, जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोवेनंट युनिव्हर्सिटी, ओटा (नायजेरिया) यांच्या संयुक्त विद्यमाने मटेरियल सायन्स या विषयावरील सलग पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद आणि ऍडव्हान्सेस इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या विषयावरील सलग दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही आंतरराष्ट्रीय परिषदा ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.आर. डी.ई. अहिल्यानगरचे असोसिएट डायरेक्टर व सायंटिस्ट मंगेश कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात संशोधनाचे सामाजिक व औद्योगिक महत्त्व विशद केले. मटेरियल सायन्स, ऊर्जा आणि पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्रात होत असलेले संशोधन देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी तसेच शाश्वत विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी संशोधनाची गरज असून अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे विद्यार्थ्यांना व संशोधकांना जागतिक पातळीवरील संशोधनाची दिशा समजते,असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन स्तरावर अशा परिषदांचे आयोजन ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या परिषदांमध्ये मटेरियल सायन्स, एनर्जी आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या विषयात कार्यरत संशोधक, शास्त्रज्ञ व शैक्षणिक तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिषदेसाठी एकूण सुमारे 212 शोधनिबंध प्राप्त झाले असून त्यापैकी निवडक 69 शोधनिबंधांचे 11 सत्रांमधून सादरीकरण करण्यात आले. हे शोधनिबंध भारतासह अल्बानिया, अल्जेरिया,पोलंड, रशिया,दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स, जर्मनी, इंडोनेशिया, मलेशिया, मोरोक्को, फिलिपाईन्स, बांगलादेश, इजिप्त, म्यानमार, नेपाळ, नायजेरिया, ओमान अशा एकूण 21 देशांमधील नामांकित विद्यापीठे व संशोधन संस्थांकडून प्राप्त झाले होते. भारतातील नामांकित आयआयटी तसेच एनआयटी महाविद्यालयांचाही यात समावेश होता.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी की-नोट स्पीकर्स म्हणून डॉ.सर्जी गोरबोचेव्ह (चोंगकिंग युनिव्हर्सिटी, चीन),डॉ.संडे ओयेडेपो (मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग, कोवेनंट युनिव्हर्सिटी, नायजेरिया) तसेच प्रा.सुटेरीस कालोगिरू (युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, लिमासोल, सायप्रस) यांचे मार्गदर्शन लाभले.
उद्घाटनप्रसंगी जनरल सेक्रेटरी डॉ.पी.एम. गायकवाड, संचालक डॉ. अभिजीत दिवटे तांत्रिक संचालक प्रा.सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ.रविंद्र नवधर तसेच महाविद्यालयातील सर्व अभियांत्रिकी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच ऑनलाइन पद्धतीने जगभरातील विविध विद्यापीठांमधील शैक्षणिक तज्ज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. संदीप काळे (डायरेक्टर, टेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर, इंडिया) आणि डॉ.अजय मिश्रा (अकॅडमी ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी अँड वेस्ट वॉटर इनोव्हेशन्स, जोहान्सबर्ग) यांचा समावेश होता.
या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झालेल्या शोधनिबंधांचे मूल्यमापन शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील 22 मान्यवरांच्या पॅनलने केले. या पॅनलमध्ये डॉ. गौरव गुगलीयानी, डॉ.कुंदन मिश्रा, डॉ.एम.बी. वाघेला,डॉ. खुबीलाल खत्री, डॉ.निलेश तिवारी, डॉ.सचिन देसाई, डॉ.किशोर काळे, डॉ.विष्णू अहेर, डॉ.महेश नगरकर, डॉ.सचिन घालमे, डॉ.लक्ष्मण अभंग, डॉ.संजय बेलकर, डॉ.विजय गडाख, डॉ.स्वप्रिल व्यवहारे, डॉ. स्वप्निल लहाने,डॉ. संदीप थोरात, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ.अजित लावरे, डॉ.सुशील मगर, डॉ.प्रशांत नरवडे, डॉ.मनोज वाघ आणि डॉ.राजेंद्र कल्हापुरे यांचा समावेश होता.
मटेरियल सायन्स विषयावरील सादर शोधनिबंध स्कोपस, वेब ऑफ सायन्स आणि गुगल स्कॉलर मानांकित स्वित्झर्लंड येथील ट्रान्सटेक पब्लिकेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहेत. तसेच एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग विषयावरील शोधनिबंध इंटरनॅशनल जर्नल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमिक्स (अमेरिका), जर्नल ऑफ रिन्यूएबल एनर्जीज तसेच रिन्यूएबल एनर्जी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुशील मगर यांनी विशेष प्रयत्न केले. रिसर्च स्कॉलर्स, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ, शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदांचा संशोधन सादरीकरणासाठी प्रभावी मंच म्हणून उपयोग केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. या आंतरराष्ट्रीय परिषदांचे कन्व्हेनर म्हणून डॉ.कानिफ मरकड यांनी जबाबदारी पार पाडली.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉ.पी. एम.गायकवाड, संचालक डॉ. अभिजीत दिवटे, संचालक प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ.रविंद्र नवधर यांनी या दोन आंतरराष्ट्रीय परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या निमित्ताने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील,चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा देत आयोजकांचे अभिनंदन केले.
.webp)