
अहिल्यानगर महापालिकेत महापौर राष्ट्रवादीकडे, उपमहापौर भाजपकडे; ज्योती गाडे व धनंजय जाधव यांची उमेदवारी निश्चित
अहिल्यानगर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (ता. २) सकाळी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये पार पडली.
या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे तर उपमहापौरपद भाजपकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती गाडे यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, उपमहापौरपदासाठी भाजपकडून धनंजय जाधव यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे. दोन्ही उमेदवार लवकरच महापालिकेत जाऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.