Samartha Vidya Mandir | शालेय जीवनात संस्कारांची जोड आवश्यक – वैद्य अनिकेत घोटणकर

Samartha Vidya Mandir | दासनवमी निमित्त समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन

 

Samartha Vidya Mandir | नगर : दर्शक ।  
 शालेय जीवनात पारंपरिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना धार्मिक, संस्कारक्षम विचारांची ओळख करून देणे आणि समाजातील संतांचे विचार समजून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी हे विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारावेत, यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन गरजेचे आहे. या स्पर्धा म्हणजे समर्थांचा विचार, रामाची भक्ती आणि हनुमानाची व्यक्तिमत्त्वशक्ती यांचा त्रिवेणी संगम असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वैद्य अनिकेत घोटणकर यांनी केले.
      समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दासनवमी निमित्त दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धासोहळ्याचे उद्घाटन समर्थ विद्या मंदिर (प्राथमिक विभाग), सांगळे गल्ली येथे रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने मोठ्या उत्साहात पार पडले.
      यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्य अनिकेत घोटणकर, शालेय समितीचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे सदस्य सुनील जोशी, संध्याताई कुलकर्णी, मुख्याध्यापक सुनील कानडे, सावेडी प्रशालेच्या प्राचार्या सुद्धा जोशी, मुख्याध्यापक अजय महाजन, धनश्री गुंफेकर यांच्यासह शहरातील विविध शाळांचे शिक्षक, पालक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    पुढे बोलताना वैद्य अनिकेत घोटणकर म्हणाले की, समर्थ रामदासांचे विचार हे केवळ धार्मिक नसून ते जीवन घडविणारे आहेत. शिस्त, कष्ट, आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची बीजे विद्यार्थीदशेतच रोवली गेली पाहिजेत. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर समर्थ विचारांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा मिळते.
      समर्थ विद्या प्रसारक मंडळ गेल्या ५० वर्षांपासून नगर शहरात या स्पर्धांचे सातत्याने आयोजन करत असून या उपक्रमाला दरवर्षी शहरातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षी निबंध, हस्ताक्षर, चित्रकला, पाठांतर, वक्तृत्व आणि गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून अहिल्यानगर शहरातील विविध शाळांमधील सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत.

आजचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे असावे

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक अजय महाजन यांनी समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, आजचे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे असावे, हीच काळाची गरज आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. शिस्त, परिश्रम, स्वावलंबन, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये समर्थ विचारांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून निष्ठेने करत आहे.
     पुढे ते म्हणाले की, दासनवमी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, पाठांतर अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला चालना मिळते. स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे असले तरी सहभागातून मिळणारा आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कार हेच खरे यश आहे. पालक, शिक्षक आणि संस्थेच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवता येत आहे.
       शालेय समितीचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समर्थ विचारांचा प्रचार व प्रसार करणारा हा ज्ञानरूपी यज्ञ सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे आणि भविष्यातही तो अविरतपणे चालू राहील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पांडव यांनी केले तर आभार प्रदर्शन लीना बंगाळ यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, शिस्त व संस्कारमूल्यांच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
Scroll to Top