Sant Nirankari | निरंकारी सतगुरुंच्या पावन सान्निध्यात आयोजित सामूहिक विवाह समारोहात 82 जोडपी विवाहबद्ध

Sant Nirankari | नगर : दर्शक ।
निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह देशभरातील अनेक राज्यांतून आलेल्या 82 जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर सांगलवाडी, सांगली येथील समागम मैदानावरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या विवाह सोहळ्यामध्ये आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी वधू-वरांचे अभिनंदन करुन गृहस्थ जीवनातील जबाबदाऱ्या समजून घेऊन त्या एकोप्याने, आदराने व प्रेमाने कुशलपणे निभावण्याची शिकवण दिली.
आपल्या सामाजिक दायित्वांचा निर्वाह करत असतानाच सदोदित सेवा, सिमरण, सत्संगाशी जोडून राहून एकमेकांच्या सहयोगाने आपली भक्ती आणखी मजबूत करण्याची प्रेरणा दिली.
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पारंपारिक जयमाला
या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पारंपारिक जयमाला तसेच निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा-हार (सामायिक हार) प्रत्येक जोडीच्या गळ्यामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत घालण्यात आले. त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवन जगण्याची शिकवण प्रदान करणाऱ्या निरंकारी लावांचे सुमधूर गायन करण्यात आले.
समारोहामध्ये सतगुरु माताजी व निरंकारी राजपिता जी यांनी वधूवरांवर पुष्प-वर्षाव करुन आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला. कार्यक्रमात उपस्थित वधू-वरांशी संबंधित कुटुंबीय आणि साध संगतने देखील पुष्प-वर्षाव केला. निश्चितपणे हे एक विलोभनीय दृश्य होते.
आजच्या या शुभ विवाह सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, धाराशिव, मुंबई, ठाणे, पुणे, डोंबिवली, पालघर, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक, लातुर, बीड, परभणी, नागपुर, वर्धा, गोंदिया,
रत्नागिरी एवं सिंधुदूर्ग तसेच अन्य राज्यांपैकी उत्तर प्रदेशातील गोरखपुर, गाजीपुर व अलाहाबाद, कर्नाटकातील बेळगावी, उडुप्पी (कोंडापुर) आणि छत्तीसगड़ येथील अंबिकापुर (सुरगुजा) इत्यादी ठिकाणांहून आलेल्या 82 जोडप्यांचा समावेश होता.
उल्लेखनीय आहे की या साध्या विवाह समारंभात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर आणि उच्च शिक्षित वधू-वरांचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकत होते.
परंतु त्यांनी सतगुरुंच्या पावन छत्रछायेमध्ये त्यांच्या दिव्य शिकवणीचा अंगीकार करत साध्या पद्धतीने विवाह करुन समाजासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. निश्चितपणे साध्या विवाहांचे हे विलोभनीय दृश्य जाती-वर्ण इत्यादिंची विषमता दूर करुन एकत्वाचा सुंदर संदेश प्रस्तुत करत होते, जो संत निरंकारी मिशनचा संदेशदेखील आहे.