सर्जेपुरा पोस्ट ऑफिस बंद करण्याच्या हालचालींना तीव्र विरोध ; लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
नगर : दर्शक ।
सर्जेपुरा, अहिल्यानगर येथील पोस्ट ऑफिस बंद करण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, या निर्णयाला स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात उपमहापौर, नगरसेविका व नगरसेवकांनी मा. वरिष्ठ डाक अधीक्षक, हेड पोस्ट ऑफिस, अहिल्यानगर यांना निवेदन देत सर्जेपुरा पोस्ट ऑफिस कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, अशी ठाम मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सर्जेपुरा पोस्ट ऑफिस हे सर्जेपुरा, तेलीखुंट, डाळमंडई भागातील रामवाडी, बागडपट्टी, दादा गॅरेज, कोठला बस स्थानक, दिल्ली गेट परिसर, बालिकाश्रम रोड आदी दाट लोकवस्तीच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. या भागातील खातेदारांची संख्या मोठी असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच सुमारे २० अल्पबचत एजंट व त्यांच्याशी संबंधित शेकडो खातेदारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे, असा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.
तसेच या परिसरात पंजाब बँक, एस.टी. विभागीय कार्यशाळा, पोलीस मुख्यालय, ओरिएंटल बँक, लातूर बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय व खासगी संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांसाठी सर्जेपुरा पोस्ट ऑफिस हे सोयीचे आणि जवळचे सेवा केंद्र असून, ते बंद झाल्यास व्यवहारांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. विशेषतः महिला अल्पबचत एजंट यांच्या रोजगारावर आणि कामकाजावर याचा गंभीर परिणाम होईल, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, जर सर्जेपुरा पोस्ट ऑफिस बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर परिसरातील निवडून दिलेले प्रतिनिधी आणि नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. हा निर्णय सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून अयोग्य असून, नागरिकांच्या मूलभूत सोयींवर गदा आणणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या निवेदनावर उपमहापौर धनंजय कृष्णा जाधव, नगरसेविका सौ. शीतल अजय ढोणे, सौ. मयुरी प्रशांत जाधव आणि सागर राजू मुर्तडकर यांच्या स्वाक्षऱ्या असून, सर्जेपुरा पोस्ट ऑफिस बंद न करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे. आता डाक विभाग याबाबत कोणता निर्णय घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
