Snehalay Nagar | “अपमान आणि अपयश यांचा प्रतिक्रियेऐवजी प्रेमपूर्वक स्वीकार केल्यानेच यशप्राप्ती”-अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
Snehalay Nagar | नगर : दर्शक ।
“प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी कलाकारांच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या ऑडिशनमध्ये एका प्रतिष्ठित महिलेने माझा त्वचेचा रंग आणि सौंदर्याचे मापदंड यावरून कठोर शेरेबाजी करून प्रचंड निराश केले. कर्नाड यांना आरती प्रभू यांच्या मी करीत असलेल्या नाटकाबद्दल समजल्यावर मात्र प्रभावित होऊन त्यांनी दीर्घ संवाद केला आणि दाद दिली. या अनुभवामुळे पुढील आयुष्यात अपमान आणि अपयश यांना प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार केला आणि कामातील एकाग्रता वाढवून त्यास प्रतिसाद दिल्यानेच अभिनय क्षेत्रात यशप्राप्ती झाल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी येथे केले.
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने स्नेहालय संस्थातर्फे दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या *अग्निशिखा’ पुरस्काराने* यंदा अभिनेत्री, लेखिका सोनाली कुलकर्णी यांना गौरविण्यात आले. सामाजिक जाणीव जपत
विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना गौरविण्यासाठी मागील वर्षीपासून हा पुरस्कार दिला जातो. 51 हजार रुपये ,सन्मानपत्र, पुस्तक संच असे याचे स्वरूप असते. स्नेहालय संस्थेच्या महिला कार्यकर्त्या आणि महिला विश्वस्त स्वयोगदानातून हा पुरस्कार आणि त्याचा समारंभ यांचे आयोजन करतात. इंग्लंडमधील भारताचे माजी राजदूत आणि देशातील परराष्ट्र धोरण विषयक तज्ञ कमलेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्नेहालयच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे, विश्वस्त राजीव कुमार आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुणे येथील स्नेहालयाच्या विश्वस्त मानसी चंदगडकर यांनी सोनाली यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यातून सोनालीचा जीवनप्रवास उलगडला..
रमाई मुळे देवत्व
मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, इटालियन , इंग्रजी इत्यादी भाषांमधील शंभरावर चित्रपट आणि
लहान पडद्यावरील मालिका यातून साकारलेल्या आपल्या भूमिकांबाबत सोनालीने उत्तरे दिली. सोनाली म्हणाल्या की,जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातील रमाईची भूमिका सोनाली यांनी साकारली. ही भूमिका साकारल्याने भाऊक झालेले प्रेक्षक जागोजागी धक्काबुक्की करून दर्शन घेत होते. माध्यमातून होणाऱ्या प्रतिमा निर्मितीचा प्रभाव यातून अनुभवला. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी सुद्धा रमाईच्या भूमिकेची जबरदस्त तारीफ करून सुखद धक्का दिला. डॉ. प्रकाश बाबा आमटे , द रियल हिरो ,या चित्रपटात डॉ. मंदा आमटे यांची भूमिका साकारताना भूमिकेशी भावनिक एकरूपता झाल्याने त्यांच्या आव्हानात्मक सेवाकार्याची जाणीव झाली. इटालियन चित्रपटाच्या निमित्ताने ओमर शरीफ या दिग्गज दिग्दर्शकाचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. आयुष्यात सतत पाय जमिनीवर ठेवणे आणि समाजाशी नाते जपत आपण कोणीही वेगळे आणि श्रेष्ठ नाही , याची जाणीव ठेवणे , हे अशा महानुभवामुळे शिकता आले. असे माणुसकी सघन करणारे अनुभव हीच अभिनय क्षेत्रातील खरी कमाई असल्याचे सोनाली यांनी सांगितले.
आपण सामाजिक कार्यकर्ते नसून सजग कर्तव्यशील नागरिकाची भूमिका मात्र बजावत असल्याचे सांगून सोनाली म्हणाल्या की, आमिर खान यांचे पाणी फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत विनोबा ॲप अशा विविध सामाजिक कामांचा भाग बनल्याने स्वतःची सकारात्मकता वृद्धिंगत होत राहिली.
विकासाची जननी महिलाच
युनायटेड नेशन्स आणि इंग्लंडसह जगातील विविध देशात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री.शर्मा यांनी आपले प्रेरक अनुभव आणि निरीक्षणे नमूद केली. ते म्हणाले की, कॉमनवेल्थ अभ्यासगटाच्या माध्यमातून स्त्रियांचा विकास हाच कुठल्याही देशाचा आणि विश्वाचा विकास असल्याबाबत 35 वर्षांपूर्वी अभ्यासपूर्वक त्यांनी मांडणी केली. त्यामुळे *पूर्व तीमोर* सारख्यांना काही देशांनी स्वातंत्र्य मिळताच देश विकासाचे प्रतिमान बनवताना त्यांचे मार्गदर्शन घेतले. आजही मुलांच्या ऐवजी मुलींच्या शिक्षणाला कुटुंबाने प्राधान्य दिले तर सामाजिक प्रगतीचा परिघ प्रचंड विस्तारू शकतो, असे विविध दाखले देत श्री. शर्मा यांनी स्पष्ट केले.
स्नेहालयचा ‘स्नेहाधार’ प्रकल्प अहिल्यानगरच्या 20 किलोमीटर परिघातील 10 गावांमध्ये *महिला सशक्तीकरण अभियान* राबवतो. याद्वारे संकट आणि अत्याचारग्रस्त
महिलांना तात्काळ कायदेशीर मदत, समुपदेशन, रोजगार संधी, निवारा इ.उपलब्ध करून दिला जातो. या गावांमधून महिला आधारगटातील 500 महिला संघटक अग्निशिखा पुरस्कार वितरण कार्यक्रमात सहभागी झाल्या.
राजीव कुमार यांनी प्रास्ताविक, डॉ. अंशू मुळे यांनी सूत्रसंचालन तर जयाताई जोगदंड यांनी आभार प्रदर्शन केले. अभिजीत क्षीरसागर यांनी मानपत्राचे लेखन आणि वाचन केले.
.webp)