Snehalay | समाजाने वाळीत टाकलेल्या महिलांनी बांधलेली राखी नेहमीच स्मरणात राहील – रोहित भांड

Snehalay | समाजाने वाळीत टाकलेल्या महिलांनी बांधलेली राखी नेहमीच स्मरणात राहील – रोहित भांड

Snehalay | नगर : दर्शक । , दि. 09 ऑगस्ट 2025

समाजाने वाळीत टाकलेल्या वंचित महिलांनी बांधलेली राखी नेहमीच स्मरणात राहील. या महिलांचे जीवन नरकमय झाले असून, कोणीही त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत नाही. मात्र आजचा कार्यक्रम त्यांच्या सन्मानाचे प्रतीक ठरला आहे, असे प्रतिपादन युवा चेतना फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते रोहित भांड यांनी केले.

गेल्या १४ वर्षांपासून समाजातील वंचित महिलांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा युवाचेतना फाऊंडेशन आणि स्नेहालय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. यंदा देखील स्नेहालयच्या गांधी मैदानातील कार्यालयात स्नेह्ज्योत प्रकल्पांतर्गत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे युवाचेतना फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. अमरजी (भैय्या) कळमकर यांची सामाजिक बांधिलकीची भावना आणि स्नेहालयचे प्रकल्प संचालक मा. प्रविणजी मुत्याल सर यांचे मार्गदर्शन लाभले. वंचित महिलांना समाजाचा अविभाज्य घटक मानून त्यांच्यात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

कार्यक्रमास एकात्मिक सल्ला व उपचार केंद्राचे समुपदेशक मा. विनय ईदे, महिला प्रतिनिधी मीनाताई पाठक, जिल्हा रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ नोवेल सात्राळकर सर, स्नेहालयचे कार्यकर्ते आणि वंचित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी महिला प्रतिनिधी रंजना रणनवरे व शोभा साळुंके यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सांगितले की, “आज आम्हाला समाजात कोणी बहिण, आई, मावशी म्हणत नाही. मात्र तुम्ही आमच्याशी राखी बांधून भावासारखा प्रेमाचा धागा जुळवला. त्यामुळे आमचे डोळे पाणावले आहेत.”

कार्यक्रमात स्नेहालयच्या स्नेह्ज्योत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बुरम सर यांनी महिलांना सक्षम होण्यासाठी प्रेरित करताना आरोग्य व सामाजिक मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आकाश काळे यांनी केले. त्यांनी महिलांसाठी चालू असलेल्या आरोग्य केंद्रे, सक्षमीकरण उपक्रम, संघटन या बाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर उपस्थित महिलांनी सर्व पाहुण्यांना राखी बांधत आपला आनंद व्यक्त केला. लाभार्थी महिलांची HIV व VDRL तपासणी करून आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी विशाल कापसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रविण बुरम यांनी मानले.

Scroll to Top