Social Work | मातृदिन निमित्त निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र्य अभियान’ कौतुकास्पद – आदित्य नडीमेटला

Social Work | नगर : दर्शक । निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या उद्देशाने मातृदिन निमित्त महापद्मसेनेच्या वतीने चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र्य अभियान उपक्रमात समाजातील दानशुर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्याने नगरशहरातील 25 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
मातृदिन महापद्मसेनेच्या वतीने सावेडी येथील श्रमिकनगर येथे शहरातील विविध भागातील 25 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आदित्य नडीमेटला, विनित बुराला, रवि दंडी, किरण वल्लाकट्टी, राजेंद्र इगे, अमित बिल्ला, अमोल येनगंदुल, शंकर जिंदम, उदय सुरम आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक आदित्य विलास नडीमेटला म्हणाले कि, मातृदिनी महापद्मसेनेच्या वतीने शहरातील विविध भागातील 25 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे, शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा, त्यांचा शैक्षणिक विकास घडावा आणि सामाजिक समानतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला आहे.
गणवेश हा केवळ कपडा नसून तो शिस्त, एकता आणि समतेचे प्रतीक आहे. आज या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद, त्यांची आत्मभानाची चमक आणि पालकांच्या चेहर्यावर उमटलेले समाधान हीच खरी आमच्या कार्याची पावती आहे.
यावेळी बोलताना शंकर जिंदम म्हणाले की, मातृदिनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यामागे मातृशक्तीच्या त्याग, संस्कार आणि प्रेरणेची आठवण करून देण्याचा हेतू आहे. आई जशी मुलांच्या शिक्षणासाठी अविरत परिश्रम करते, त्याग करते, त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य संधी मिळावी, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
पुढेही अशा प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम महापद्मसेनेच्या वतीने हाती घेतले जातील. आज गणवेश घेणारे हे विद्यार्थी उद्या समाजाचे उज्ज्वल भवितव्य घडवतील, याच उद्देशाने महापद्मसेनेच्या वतीने ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र’ हा उपक्रम राबविण्यात आला,असे ते म्हणाले.
यावेळी महापद्मसेनेचे उदय सुरम म्हणाले कि, येत्या काही काळात ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र अभियाना’च्या माध्यमातून शहरातील विविध भागातील निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवि दंडी यांनी केले. तर आभार राजेंद्र इगे व अमित बिल्ला यांनी मानले.