Vijay Wadettivar | “दाल में कुछ तो काला” – विमान अपघातावर वडेट्टीवारांचा थेट संशय

Vijay Wadettivar | “दाल में कुछ तो काला” – विमान अपघातावर वडेट्टीवारांचा थेट संशय

 

 

Vijay Wadettivar |  अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या शंकांमध्ये तथ्य असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विमान अपघात प्रकरणात “दाल में कुछ तो काला” असल्याचा संशय व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सायंकाळी शपथ घेतली. मात्र, हा शपथविधी आपल्या हिंदू परंपरा आणि संस्कृतीनुसार झाला, असे मानण्यास अनेकजण तयार नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय एवढ्या घाईने का घेतला, असा प्रश्न उपस्थित होत असून, भाजपच्या दबावामुळेच हा निर्णय झाला असावा, असा दावा त्यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलगीकरण होऊ नये, अशी भाजपची भूमिका होती आणि त्यामुळे भाजपसोबत वाटाघाटी करणाऱ्या काही नेत्यांचीही हीच इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.

 

विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. अपघाताच्या वेळी तिथे धुकं नव्हतं तर धोका होता, आणि त्यामुळे अजित पवार यांचा १०० टक्के घात झाला, असा आरोप त्यांनी केला. या दाव्यांमध्ये तथ्य असल्याचे वडेट्टीवार यांनी मान्य करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी, असे स्पष्ट केले.

 

“महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के लोक या घटनेबाबत संशय व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळेवर पायलट का बदलण्यात आला, हा देखील गंभीर मुद्दा आहे. ज्या पायलटचे नाव आधी समोर आले होते, तो पायलट वेळेवर पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे तो जिवंत आहे,” असेही वडेट्टीवार म्हणाले. चौकशीतून जे सत्य समोर येईल, तेच अंतिम सत्य मानले जावे, असे त्यांनी सांगितले.

 

उपमुख्यमंत्री पदग्रहणाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, दशक्रिया झाल्याशिवाय कोणताही पदभार स्वीकारता येत नाही. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर तात्काळ राजीव गांधी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याचा दाखला दिला. मात्र, पंतप्रधान पद हे संवैधानिक असून ते रिकामे ठेवता येत नाही, तर उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही. त्यामुळे तेरावीच्या कार्यक्रमानंतरही शपथविधी होऊ शकला असता, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विमानातून सहा जण प्रवास करत असताना पाचच मृतदेह कसे मिळाले, सहावी व्यक्ती कोण होती आणि तिचा मृतदेह का सापडला नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सर्व मृतदेह पूर्णपणे जळून गेल्याने ओळख पटवणे अशक्य होते, मात्र त्याचवेळी अजित पवार यांच्या जवळील कागदपत्रे जळाली नाहीत, हा संशयाचा मुद्दा असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रश्न उपस्थित केला असून, “अजित पवार यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची एखादी फाईल होती का? ती फाईल मुंबईहून बारामतीला सुरक्षित नेली जात होती का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

Scroll to Top