Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत AURA 2.0 तंत्रज्ञान महोत्सवात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता व नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध
नगर : दर्शक ।
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला “AURA 2.0” तंत्रज्ञान महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवसीय महोत्सवात ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली तांत्रिक क्षमता, सर्जनशीलता आणि नवकल्पना सादर केल्या.
दरवर्षी आयोजित करण्यात येणारा AURA हा तंत्रज्ञान महोत्सव विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. “कोड, कंपीट अँड कॉनकुअर” या संकल्पनेवर आधारित या महोत्सवातून विद्यार्थ्यांना कोडींग, सॉफ्टवेअर निर्मिती, सर्जनशील डिझाईन, प्रकल्प सादरीकरण, तांत्रिक स्पर्धा तसेच विविध उपक्रमांद्वारे आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन स्टुडन्ट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, तांत्रिक विचारसरणी आणि नवनवीन तंत्रज्ञानाशी जोड निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
या महोत्सवात विविध आकर्षक आणि रोमांचक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बग ऑक्शन , टेक ट्रेझरर , प्रकल्प स्पर्धा, बॉक्स क्रिकेट स्पर्धा , मिस्टरी गेम , ई-क्रीडा स्पर्धा, प्रॉम्प्ट शो डाऊन ट्रेझरर हंट अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कोडींग कौशल्य, सर्जनशीलता, तांत्रिक विचारशक्ती आणि समूहकार्याची कसोटी लागली. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवाचे उद्घाटन तांत्रिक संचालक प्रा. सुनिल कल्हापुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी तांत्रिक प्रयोग, संशोधन आणि नवकल्पना यावर भर दिला पाहिजे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान महोत्सव विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देतात आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना व समस्या निराकरण क्षमता विकसित होते . “कोड, कंपीट अँड कॉनकुअर ” ही संकल्पना विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेत जिंकण्यासाठी नाही तर जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करणारी आहे. भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहणे आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विज्ञान व डिझाईन विभागप्रमुख डॉ.रविंद्र तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.पूजा काजळे यांनी शिक्षक समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही नियोजनबद्ध पद्धतीने काम करत हा महोत्सव यशस्वी केला.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र नवथर, तांत्रिक संचालक प्रा. सुनिल कल्हापुरे, सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम. गायकवाड तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील,संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सर्जनशीलतेचा संगम घडविणारा AURA 2.0 महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांमधून तरुण पिढीला नवे तांत्रिक क्षितिज गाठण्याची प्रेरणा मिळत राहील.असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
.webp)