ZP School | धोत्रे खुर्द जि. प. शाळेतील ‘शेतीमाल विक्री’ उपक्रमाचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून कौतुक

ZP School | नगर : दर्शक ।
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्द येथे शिक्षकांच्या पुढाकारातून राबविण्यात येणार्या ‘मातीशी नातं’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाने शिक्षण क्षेत्रासह ग्रामविकासातही नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात स्वतंत्र ‘मातीशी नातं’ कक्षाची स्थापना करण्यात आली असून, गावात उत्पादित होणारा शेतीमाल व कडधान्ये थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांना थेट बाजारपेठ मिळत असून, स्थानिक व सेंद्रीय उत्पादनांना चालना मिळत आहे. शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता ग्रामविकास व आत्मनिर्भरतेचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून येत आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी या उपक्रमाची दखल घेत शाळेतील शिक्षक सचिन ठाणगे व नंदा चेमटे यांचे विशेष कौतुक केले. शाळा आणि गाव यांच्यातील नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम असून, तो राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
विद्यार्थ्यांना शेती, कडधान्य उत्पादन, विक्री प्रक्रिया तसेच आर्थिक व्यवहार यांचे प्रत्यक्ष व व्यवहार्य ज्ञान मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कृती, आत्मनिर्भरतेची भावना आणि सामाजिक जबाबदारी अधिक बळकट होत आहे.
शाळेमध्ये गावात तयार होणारा सेंद्रीय भाजीपाला, गावराण कडधान्ये, ज्वारी, बाजरी, गहू, लोकर, घोंगडी आदी शेतीमाल बाजारपेठेच्या तुलनेत कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाला शेतकरी, पालक व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, शाळेला गावाची आणि गावाला शाळेची मदत मिळत असल्याने हा उपक्रम ‘स्थानिक ते राष्ट्रीय’ या संकल्पनेला साकार करणारा असून, राज्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केले.
एकूणच ‘मातीशी नातं’ या उपक्रमामुळे शिक्षण, शेती आणि ग्रामविकास यांचा सुंदर संगम साधला जात असून, धोत्रे खुर्दची जि. प. शाळा राज्यासाठी एक आदर्श नमुना ठरत आहे