Dindi | खिस्त गल्लीत भक्तिमय वातावरण; फुलांची उधळण, अल्पोपहाराने वारकऱ्यांचे स्वागत
वर्धमान तरुण मंडळाकडून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे उत्स्फूर्त स्वागत; वारकऱ्यांची सेवा करत जपली सामाजिक बांधिलकी
Dindi | नगर : दर्शक । आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे
मार्गस्थ झालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी
सोहळ्याचे खिस्त गल्ली कारंजा येथील वर्धमान तरुण मंडळाच्या वतीने
अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात स्वागत करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचे फुलांची
उधळण, आकर्षक सजावट आणि आतषबाजीच्या माध्यमातून जल्लोषात
स्वागत केले. या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
हजारो वारकऱ्यांना या सेवेमुळे मोठा दिलासा
यावेळी वर्धमान तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे
तसेच थंड पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. पायी चालत आलेल्या
हजारो वारकऱ्यांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला. याशिवाय वारकऱ्यांच्या
विविध गरजा लक्षात घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सेवाभावाने अनेक
सुविधा उपलब्ध करून दिल्या. वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती
मानत मंडळाच्या सदस्यांनी अत्यंत समर्पित भावनेने सेवा कार्य पार पाडले.
आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून लाखो वारकरी
पायी दिंड्यांच्या माध्यमातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान
करत आहेत. त्याच पारंपरिक व भक्तिमय सोहळ्याचा भाग म्हणून त्र्यंबकेश्वर
येथून निघालेला संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे
अहिल्यानगर शहरातून मार्गक्रमण करत पंढरपूरकडे रवाना झाला.
या पालखीचे स्वागत करण्यासाठी खिस्त गल्ली परिसरात
भाविक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
स्वागतानंतर वारकऱ्यांनी अल्पोपहाराचा लाभ घेतला आणि विठ्ठल
नामाचा गजर करत पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.
“ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून
गेला होता. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि मंडळाच्या
कार्यकर्त्यांचा सेवाभाव यामुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला.
वर्धमान तरुण मंडळ हे केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे उपक्रम राबवत असते. गरजूंना मदत, आरोग्यविषयक उपक्रम, सामाजिक जनजागृती, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून मंडळ समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहे. समाजसेवा आणि लोकहिताचे कार्य हेच आपले ध्येय मानून मंडळाचे कार्यकर्ते सातत्याने विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.
या स्वागत सोहळ्यावेळी वर्धमान तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी केलेले नियोजन आणि उत्साहामुळे हा स्वागत सोहळा यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
