August 8, 2026

Nagar Shivsena | ठेकेदारांकडे ७ कोटींची थकबाकी, पण ८ कोटींची नोटीस कामगारांना

image - 2026-07-10T201455.387

Nagar Shivsena | सहाय्यक कामगार आयुक्तांचा अजब कारभार, कामगारांचा आक्रमक पवित्रा 

नगर : दर्शक । Nagar Shivsena | रेल्वे मालधक्का येथील नोंदणीकृत

माथाडी कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर तथा

अध्यक्ष माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ठेकेदार हुंडेकऱ्यांकडून सुमारे सात कोटी रुपयांची थकबाकी

असताना ती वसूल करण्या ऐवजी उलट गोर गरीब कामगारां कडूनच

तब्बल आठ कोटी रुपयांची वसुलीची कारवाई सुरू केल्याचा आरोप

करण्यात आला आहे. यामुळे मंडळ हे कामगारांच्या हितासाठी आहे की

थकबाकीदार असणाऱ्या बड्या ठेकेदारांना संरक्षण देण्यासाठी,

असा संतप्त सवाल शिवसेना कामगार आघाडीचे

जिल्हाप्रमुख विलास उबाळे यांनी उपस्थित केला आहे.

कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्याची मागणी

ठेकेदारांकडे कोट्यावधींची थकबाकी असताना ८ कोटींच्या वसुलीच्या नोटीसा मात्र माथाडी कामगारांना धाडण्यात आल्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्या विरोधात कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देत कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, जयराम आखाडे, गौतम सैंदाने, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, विनोद शिरसाठ, मल्हारी साप्ते, दिपक काकडे, राजेंद्र तरटे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याबाबत बोलताना विलास उबाळे म्हणाले, ठेकेदार हुंडेकऱ्यांकडे मागील सुमारे तीन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. त्याचा पहिला हप्ता मिळविण्यासाठी आम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन, मुंबईत आझाद मैदानावर सहा दिवस उपोषण, त्यानंतर बायको, लेकरा बाळांसह अहिल्यानगर शहराच्या बाजारपेठेतून आक्रोश मोर्चा काढावा लागला होता. तेव्हा कामगारांच्या पदरात पहिला हप्ता पडला. मात्र त्यानंतर दोन वर्ष उलटले तरी देखील जाणीवपूर्वक ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम मंडळाकडून सुरू आहे. आम्ही मागणी करतो म्हणून आमचा आवाज दाबण्यासाठी आमच्यावरच चुकीच्या पद्धतीने तब्बल आठ कोटी रुपयांची वसुलीची कारवाई सुरू करून कामगारांना भीती दाखवली जात आहे. 

निवेदनात म्हटले आहे, ऑगस्ट २०२५ पासून हजेरी पत्रकानुसार पूर्ण वेतन देखील मिळत नसून दर महिन्याला वेतनात कपात करून कामगारांचे आर्थिक शोषण केले जात आहे. कामगारांनी अन्यायकारक वसुली मागे घेणे, थकबाकीदार ठेकेदार हुंडेकऱ्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणून वसुली करणे, प्रत्येक कामगाराच्या वेतनाची स्वतंत्र लेखा परीक्षणाद्वारे तपासणी करणे, वेतन कपातीचा लेखी खुलासा देणे आणि कपात केलेली रक्कम व्याजासह परत देणे अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

अन्यथा आंदोलनाचा इशारा : 

गोरगरीब कामगारांनी हे कोट्यावधी रुपये आणायचे कुठून ? असा सवाल करत, यासंदर्भात सात दिवसांच्या आत लेखी खुलासा व थकबाकीदार ठेकेदारांच्या विरोधात ठोस कारवाई न झाल्यास सर्व कामगार सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सामूहिक फाशी देण्याची मागणी मंडळाकडे सर्व कामगार करणार असल्याचा विलास उबाळे यांनी इशारा दिला आहे. वेळ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा उबाळे यांनी यावेळी बोलताना दिला.