July 30, 2026

श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर

image - 2026-07-30T140718.376

     नगर : दर्शक । नगर शहरातील नामांकित श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी संस्थेचे चेअरमन मा. श्री. जी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत संस्थेच्या सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची एकमताने निवड करण्यात आली.

         या निवडीत ज्ञानदेव शहाणे, संजय उगले, नारायणराव गुंड, प्रमोद देवधर, प्रसाद पवार, गौरव झंवर, मदन जामगांकर, स्वप्नील पारख, लिलाराम खन्ना, सौ. जयश्री बागडे व सौ. शशिकला भालसिंग यांची सर्वानुमते संचालक म्हणून पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे उपस्थित सभासदांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

          संस्थेच्या ५९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेले विविध विषय सभासदांनी चर्चेअंती एकमताने व खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर केले. संस्थेच्या आगामी वाटचालीसंदर्भातही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. संस्थेची प्रगती, सभासदांच्या हिताचे उपक्रम तसेच संस्थेचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेण्याबाबत नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, संस्थेचे मावळते चेअरमन मा. श्री. जी. के. पाटील यांनी तब्बल ३१ वर्षे संस्थेचा कारभार समर्थपणे सांभाळत संस्थेला नावारूपाला आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेचा कारभार शिस्तबद्ध, पारदर्शक व चोखपणे हाताळण्यात आला. संस्थेच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल सभासदांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

          डॉ. स्वरुपकुमार मगर, डॉ. सोपान गोरे व श्री. विजयराव देशपांडे यांच्या हस्ते जी. के. पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढत त्यांचे अभिनंदन केले.

         तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळातील सर्व सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचा कारभार अधिक गतिमान करून सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नूतन संचालक मंडळास उपस्थितांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

         सभेच्या शेवटी श्री. ज्ञानदेव शहाणे यांनी आभार मानले. उपस्थित सभासद, पदाधिकारी व मान्यवरांचे आभार व्यक्त केल्यानंतर राष्ट्रगीताने ५९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली.