Shrigonda | कौडगाव विकासासाठी २.५० कोटी निधीची मागणी
Shrigonda | ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’मध्ये आ. विक्रमदादा पाचपुते यांना बाबासाहेब धिवर यांचे निवेदन
Shrigonda | नगर : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २७ जुलै २०२६ रोजी कांडेकर लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत कौडगावच्या विविध विकासकामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा खेडेगाव विकास संघटना, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सहादू धिवर यांनी श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कौडगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कामांना प्राधान्याने निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. गावातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही विकासकामे अत्यंत गरजेची असल्याचे नमूद करण्यात आले.
निवेदनानुसार दलित बस्ती गावठाण येथे बुद्धविहार व सांस्कृतिक भवनासाठी १ कोटी रुपये, गावठाणातील स्मशानभूमीचे वाढीव काम व सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपये, भैरवनाथ मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकसाठी ५० लाख रुपये, लक्ष्मी माता मंदिर बांधकाम व सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपये, तसेच कौडगावच्या जुन्या बाजारतळावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणीसाठी ४० लाख रुपये असा एकूण २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बाबासाहेब धिवर म्हणाले, “कौडगावचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. गावातील अनेक विकासकामे प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल. बुद्धविहार, सांस्कृतिक भवन, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, मंदिर विकास आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ही केवळ विकासकामे नसून गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाशी निगडित आहेत. सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कौडगावच्या विकासासाठी अखंड प्रयत्न करत राहणार आहे.”
या प्रसंगी नगरचे तहसीलदार मिलिंद कुलथे, उपविभागीय अधिकारी कुमार चिचकर, भिंगार मंडळ अधिकारी वैशाली दळवी (मॅडम), श्री संत लक्ष्मण महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर, खर्शे सर, तलाठी भाऊसाहेब शेख, सुरूनकर, प्रवीण आटोळे, अतुल खर्शे, मच्छु इंगोले, रमेश कर्पे, शंकर काळे, दत्ता पवार तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्याकडे कौडगावच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ मध्ये ग्रामविकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
