Yadain Rafi Nagar | पंचमदा फॅन्स फौंडेशनतर्फे ३१ जुलैला ‘यादे रफी’ गीत मैफिल
Yadain Rafi Nagar | अजरामर गीतांमधून स्वरसम्राट मोहम्मद रफींना संगीतमय मानवंदना; नामवंत गायकांच्या सुरांनी रंगणार माऊली सभागृह

Yadain Rafi Nagar | नगर : दर्शक । : स्वरसम्राट स्व. मोहम्मद रफी यांच्या अजरामर स्वरांची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता यावी, त्यांच्या सदाबहार गीतांना संगीतमय मानवंदना देता यावी, यासाठी पंचमदा फॅन्स फौंडेशनच्या वतीने मोहम्मद रफी यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी ‘यादे रफी’ या विशेष गीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. सावेडी येथील माऊली सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता ही सुरेल मैफिल रंगणार असून, रफी यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतांचा बहारदार नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.
‘झी सा रे ग म प’ फेम गायक रफी हबीब, कु. भाग्यश्री डुंभरे, संदीप भुसे आणि डॉ. सत्तार सय्यद हे आपल्या सुमधुर आवाजातून स्व. मोहम्मद रफी यांच्या लोकप्रिय गीतांची मेजवानी रसिकांसमोर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिनिक्स स्किन केअर हॉस्पिटलचे डॉ. राजीव सूर्यवंशी करणार आहेत. अहिल्यानगरमधील स्थानिक कलाकारांसोबत पुणे येथील कलाकारांचाही सहभाग असल्याने या मैफिलीला विशेष रंगत येणार आहे.
स्व. मोहम्मद रफी यांनी आपल्या जादुई आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीला असंख्य अजरामर गीते दिली. प्रेमगीत, विरहगीत, भक्तिगीत, भावगीत, देशभक्तिपर गीत अशा विविध भावछटांनी नटलेल्या त्यांच्या गीतांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले. रफी यांचा स्वर हा केवळ एका काळापुरता मर्यादित न राहता आजही संगीतप्रेमींच्या मनात तितक्याच आपुलकीने रुंजी घालत आहे. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या आवाजाची मोहिनी आणि गीतांची लोकप्रियता कायम असून, याच अजरामर स्वरविश्वाची अनुभूती ‘यादे रफी’ या मैफिलीच्या माध्यमातून रसिकांना मिळणार आहे.
पंचमदा फॅन्स फौंडेशन गेल्या १६ वर्षांपासून संगीत व कला क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून रसिकांची सांस्कृतिक अभिरुची जोपासण्याचे कार्य करीत आहे. जुन्या हिंदी चित्रपट गीतांची गोडी आजही रसिकांच्या मनात कायम असून, या सदाबहार संगीताचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, जुन्या गीतांची परंपरा जपली जावी आणि रसिकांना दर्जेदार संगीताचा आनंद मिळावा, या उद्देशाने फौंडेशनच्या वतीने सातत्याने विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. सत्तार सय्यद यांनी दिली.
‘यादे रफी’ गीत मैफिलीच्या प्रवेशिका अष्टविनायक मेडिकल, चिंतामणी हॉस्पिटलजवळ, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर तसेच शांती ऑडिओ, नेता सुभाष चौक, नगर येथे उपलब्ध आहेत. संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांचा सुरेल आनंद घ्यावा, असे आवाहन पंचमदा फॅन्स फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संदीप भुसे (मो. ९३७१०५५१९२) व डॉ. सत्तार सय्यद (मो. ९८९००५०३०५) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमास अकाया इलेगन्स, डॉ. दमन काशिद हॉस्पिटल, साईसूर्य नेत्रसेवा, नाईक हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, वरद नेत्रालय, सिद्धिविनायक हॉस्पिटल, पंडित अॅक्सिडेंट हॉस्पिटल आणि फिनिक्स स्किन हॉस्पिटल यांचे मुख्य प्रायोजकत्व व सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचमदा फॅन्स फौंडेशनचे अध्यक्ष संदीप भुसे, उपाध्यक्ष डॉ. सत्तार सय्यद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
