Crime News Nagar | ‘कट्टे’ घेऊन आले, पण थेट पोलीस कोठडीत पोहोचले!

एलसीबीची धडक कारवाई; १०.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Crime News Nagar | नगर : दर्शक । शहरात विक्रीसाठी आणलेले ५ गावठी कट्टे आणि एक स्कोडा कारसह १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला असून, दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणारा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करत रवाना केले होते.
१९ जुलै रोजी हे पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पिंटू उर्फ भाऊ आनंदराव सगळमारे (रा. सगळमारेवाडी, निघोज, ता. पारनेर) आणि बंटी उर्फ स्वप्नील विभूषण पाबळे (रा. कावडी पिंपळगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) हे दोघेजण त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टे विक्री करण्यासाठी एमआयडीसी डेअरी चौक ते शेंडी बायपास रोडवर एका सिल्व्हर रंगाच्या कारमध्ये थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ वडगाव गुप्ता शिवारामध्ये सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यातील व्यक्तींची व वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५ गावठी पिस्तूल, ४० हजार रुपयांचे २ मोबाईल आणि ८ लाख रुपयांची एक स्कोडा कार असा एकूण १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान पिंटू सगळमारे याने ही शस्त्रे भैय्या उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले (रा. ता. जि. धाराशिव) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.
आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेला आरोपी पिंटू सगळमारे याच्यावर पारनेर आणि शिर्डी पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवड, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, गणेश लोंढे, राहुल द्वारके, शाहिद शेख, किशोर शिरसाठ, मनोज साखरे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, प्रकाश मांडगे आणि चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.
